
भारत-इंग्लंडच्या फलंदाजांनी मिळून ठोकली २१ शतके
लंडन ः भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांच्या फलंदाजांनी मिळून भरपूर धावा केल्या. त्यामुळेच इंग्लंड आणि भारताच्या फलंदाजांनी मिळून एकूण २१ शतके झळकावली. कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा एका कसोटी मालिकेत २१ शतके झळकावली गेली आहेत. यापूर्वी १९५५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेत हा पराक्रम झाला होता. त्या मालिकेत दोन्ही संघांनी मिळून एकूण २१ शतके झळकावली.
शुभमन गिलची सर्वाधिक चार शतके
भारत-इंग्लंड मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाने येथे एकूण १२ शतके झळकावली. शुभमन गिलने या मालिकेत सर्वाधिक ४ शतके झळकावली. त्याच्याशिवाय केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांनी प्रत्येकी २ शतके झळकावली. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले. इंग्लंड संघाकडून जो रूटने तिथे सर्वाधिक ३ शतके झळकावली. त्याच्याशिवाय हॅरी ब्रुकने दोन शतकी डाव खेळले आहेत. बेन डकेट, जेमी स्मिथ, ऑली पोप आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले.
शुभमन गिलच्या सर्वाधिक धावा
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलचे नाव अव्वल आहे. त्याने या मालिकेत पाच सामन्यांच्या १० डावांमध्ये ७५.४० च्या सरासरीने २५४ धावा केल्या. जो रूटचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. रूटने ५ सामन्यांमध्ये ५३७ धावा केल्या. सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने या मालिकेत ५३२ धावा केल्या. रवींद्र जडेजाचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. जडेजाने ५ सामन्यांच्या १० डावांमध्ये ५१६ धावा काढल्या.