
मोहम्मद सिराज विजयाचा हिरो, शुभमन गिल, हॅरी ब्रूक मालिकावीर, मालिका २-२ बरोबरीत
लंडन ः मोहम्मद सिराजचा अविस्मरणीय स्पेल आणि प्रसिद्ध कृष्णाने त्याला दिलेली अप्रतिम साथ या बळावर भारतीय संघाने ओव्हल मैदानावर इंग्लंड संघाचा अवघ्या सहा धावांनी पराभव करत रोमहर्षक कसोटी सामना जिंकला. या रोमांचक विजयाने भारतीय संघाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिका २-२ अशी बरोबरीत ठेवली. भारतीय संघाने पहिल्यांदाच एवढ्या कमी धावांच्या फरकाने कसोटी सामना जिंकला आहे.

ओव्हलवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, इंग्लिश संघ ३६७ धावांवर बाद झाला. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता होती आणि भारताला चार विकेट्सची आवश्यकता होती. सिराजने तीन विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली. सिराज याने डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला तर प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट्स घेतल्या. आकाश दीपने एक विकेट घेतली. यासह, पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा संघाची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. या दौऱ्यापूर्वी कोणत्याही क्रिकेट पंडितांनी भारताला फेव्हरिट म्हटले नव्हते. तथापि, गिलच्या युवा संघाने सर्व टीकाकारांना शांत केले आणि मालिका २-२ अशी बरोबरीत आणली.
भारताने पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपला आणि इंग्लिश संघाने २३ धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आणि एकूण ३७३ धावांची आघाडी घेतली आणि ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डाव ३६७ धावांवर संपला. जो रूटच्या १०५ धावा आणि हॅरी ब्रूकच्या १११ धावा इंग्लंडला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. सिराजने शेवटच्या विकेट म्हणून यॉर्कर मारून अॅटकिन्सनला क्लीन बोल्ड करताच भारतीय चाहते आणि खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही. सिराज धावत आला आणि भारतीय खेळाडू त्याला मिठी मारण्यासाठी धावले.
इंग्लंड मालिकेत २-१ ने पुढे होता, परंतु मोहम्मद सिराजच्या दमदार कामगिरीमुळे भारताने हा सामना सहा धावांनी जिंकला आणि मालिका २-२ अशी बरोबरीत आणण्यात यश मिळवले. भारताला ही मालिका जिंकण्यासाठी अनेक संधी होत्या, परंतु महत्त्वाच्या क्षणी झालेल्या चुकीमुळे सामना उलटला. सिराज दोन कठीण संधींचा फायदा घेऊ शकला नाही, ज्यामुळे सामना उलटू शकला असता. लॉर्ड्सनंतर, ओव्हलमध्येही असेच काही घडले, परंतु आता सिराजने त्याची भरपाई केली आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.