< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); मानांकित बुद्धिबळपटूंची आगेकूच  – Sport Splus

मानांकित बुद्धिबळपटूंची आगेकूच 

  • By admin
  • August 4, 2025
  • 0
  • 141 Views
Spread the love

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर दोन्ही गटात मोठी चुरस 

जळगाव : राष्ट्रीय अंडर ११ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे चार खेळाडू मुलांच्या गटात निर्णायक स्थितीत आहे. मुलींच्या गटात मानांकित खेळाडूंनी आपली आगेकूच कायम ठेवली आहे. 

स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अद्विक अग्रवाल, अविरत चौहान या मानांकित खेळाडूंनी कसब पणाला लावत अनुक्रमे प्रल्हाद मुला आणि सौम्य दीपनाथ यांचा पराभव केला. पाचव्या पटावर राजस्थानच्या विभोर याने पश्चिम बंगालच्या ओशिक मंडळ ला बरोबरीत रोखले. प्रयाण या उत्तरप्रदेश मधील खेळाडूने कॅन्डीडेट मास्टर व्योम मल्होत्रा या हरियाणाच्या खेळाडूला बरोबरीत रोखत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. इतर मानांकित खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभूत करत आपले स्थान अबाधित राखले. 
मुलांच्या गटात चौथ्या फेरीत २३ खेळाडू तीन गुणांसह आघाडीवर होते, तर ३४ खेळाडू अडीच गुणांसह आगेकूच करीत होते. अंतिम वृत्त हाती आले तेव्हा महाराष्ट्राचे चारही खेळाडू पहिल्या दोन पटांवर निर्णायक स्थितीत होते. 

अग्रमानांकित अद्विक याने निर्वाण शाह याचा पराभव करीत अग्रस्थान अबाधित ठेवले. अविरत चौहानने कविश लिमयेचे कडवे आव्हान मोडीत काढत आशा पल्लवीत केल्या. दिल्लीच्या कॅन्डीडेट मास्टर आरीत शाहने उत्तर प्रदेशच्या प्रत्युशचा सहज पराभव केला. खळबळजनक निकालांमध्ये पाचव्या पटावर वेंकट कार्तिक ने सब्रातो मानी या पश्चिम बंगाल च्या अनुभवी खेळाडूचा पराभव केला. पाचव्या फेरीआधी १० खेळाडू ४ गुणांसह आघाडीवर असून १५ खेळाडू साडे तीन गुणांसह अजिंक्यपदाच्या शर्यतीत आपले स्थान टिकवून आहेत.

मुलींमध्ये केरळची दिवि बिजेशची आगेकूचमुलींच्या गटात तिसऱ्या फेरीत देखील मानांकित खेळाडूंनी आपली घौडदौड चालू ठेवली असून वूमन कॅन्डीडेट मास्टर आणि अग्रमानांकित दिवि बिजेश केरळच्या खेळाडूने तामिळनाडूच्या श्रीनिकाचे कडवे आव्हान मोडीत काढले, तामिळनाडूची पूजाश्री, त्रिपुराची आराध्या दास, महाराष्ट्राची क्रिशा जैन, तेलंगणाची संहिता, कर्नाटकची नक्षत्रा, पश्चिम बंगालची आदित्री बैस्य यांनी पहिल्या सात पटांवर विजय नोंदवले असून, आठव्या पटावर अरीनी सिंह या गुजरातच्या खेळाडूने कर्नाटकाच्या रिश्विता महाजनला बरोबरीत रोखले. अंतिम वृत्त हाती आले तेव्हा चौथ्या फेरीचे वरील पटावरील काही डाव अनिर्णित राहिले असून दिल्लीच्या दिवि बिजेश, तामिळनाडूच्या पूजाश्री, त्रिपुराची आराध्या दास , तेलंगणाची श्रीनिका व संहिता पुनगवनम या चार गुणांसह आघाडीवर होत्या. तर पंजाबची राध्या मल्होत्रा, कर्नाटकची नक्षत्रा, दिल्लीची वंशिका व हरियाणाची काशिका गोयल, झारखंडची दिशिता डे, केरळची जानकी आणि राजस्थानची आराध्या उपाध्याय यांनी साडेतीन गुणांसह आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.

जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरू असलेल्या ३८ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी खेळाडूंनी रंगत आणली. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राचे उद्घाटन प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ कल्याणी नागूलकर यांनी केले. यावेळी बुद्धिबळात मानसिक आरोग्यसोबत शारीरिक आरोग्याचे महत्व त्यांनी खेळाडूंना सांगितले. तर दुसऱ्या सत्राचे उद्घाटन डॉ इंद्राणी मिश्रा यांनी करुन खेळाडूंशी संवाद साधला. चांगला खेळ करत खेळभावना विकसित केली पाहिजे. बुद्धिबळमुळे बौद्धिक कौशल्य वाढते शिवाय खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोनसुद्धा सकारात्मक होत जातो. व्यासपीठावर मुख्य पंच देवाशीस बरूआ, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले, जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते.  

जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असलेल्या या स्पर्धेसाठी जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड कंपनीने प्रायोजकत्व स्वीकारले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *