
लंडन ः भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने शेवटच्या कसोटीत इंग्लंडला हरवून मालिका बरोबरीत आणली आहे. शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आणि अखेर सामना जिंकण्यात यश मिळवले. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्येही मोठी झेप घेतली आहे, तर इंग्लंड संघाला मोठा पराभव सहन करावा लागला आहे. तथापि, ऑस्ट्रेलियन संघ अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर
भारत विरुद्ध इंग्लंड मालिका संपल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट् टेबलबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियन संघ नंबर एकवर आहे. त्यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. त्यांचा पीसीटी १०० आहे. त्यानंतर श्रीलंकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामने खेळले आहेत आणि एक जिंकला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. संघाने एकही सामना गमावलेला नाही. म्हणून, त्यांचा पीसीटी ६६.६७ आहे.
भारतीय संघाची थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप
आता इंग्लंडला हरवून भारतीय संघाने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ५ सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने दोन सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. भारताचा पीसीटी आता थेट ४६.६७ वर पोहोचला आहे. त्याच वेळी, इंग्लंड संघ आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. इंग्लंड संघानेही पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. संघाचा पीसीटी सध्या ४३.३३ आहे.
बांगलादेश आणि वेस्ट इंडिज संघ मागे
बांगलादेश संघ सध्या गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर आहे. त्यांनी दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी एक सामना गमावला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. वेस्ट इंडिज संघ शेवटच्या म्हणजेच सहाव्या क्रमांकावर आहे. संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी एकही जिंकलेला नाही, संघाने सर्व सामने गमावले आहेत. त्यामुळे, त्यांचा पीसीटी शून्य आहे.