आरोग्य शिक्षणात डिजिटल हेल्थ अभ्यासक्रम महत्वपूर्ण ः कुलगुरू
नाशिक ः आरोग्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठाचा डिजिटल हेल्थ अभ्यासक्रम महत्वपूर्ण राहणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे ’चक्र’ व कोयटा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’सर्टीफिकेट कोर्स इन डिजिटल हेल्थ’ अभ्यासक्रमाचे उद्घाटन दुरस्थ पद्धतीने कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, नॅशनल एक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हाडर्सचे सुरभी गोयल, निशांत मेंधे, चिन्मय अटले, अविनाश पांडे, आयआयटी बॉम्बेचे डॉ रंजीत पंडिहान्तेरी, सुबोध मुळगुंद, डॉ अश्लेषा तावडे, मधुरा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, डिजिटल हेल्थच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाला प्रारंभ झाला आहे. विद्यापीठाने कोइटा फाऊंडेशनच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेला हा अभ्यासक्रम आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांकरीता अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. केंद्र सरकारच्या ’ विकसित भारत’ च्या धर्तीवर संशोधन आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामुळे डॅाक्टर्स आणि आरोग्य क्षेत्राती कार्यरत तज्ज्ञांमध्ये डिजिटल साक्षरता वाढेल आणि ते तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करु शकतील. विद्यापीठाचा डिजिटल हेल्थ अभ्यासक्रमाला इतर विद्यापीठासाठी आदर्श असेल असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, भविष्यातील वैद्यकीय क्षेत्र हे पूर्णपणे डिजिटल असणार आहे. त्यामुळे आपल्या तरुण डॅाक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना डिजिटल हेल्थचे महत्त्व समजावून सांगणारा अभ्यासक्रम असणे ही काळाची गरज आहे. डिजिटल हेल्थ म्हणजे केवळ डेटा एन्ट्रीचे काम नसून, ती एक स्वयंचलित प्रक्रिया आहे जी विविध ठिकाणांहून आरोग्यविषयक माहिती गोळा करुन आरोग्यसेवा वृध्दींगत करण्यास मदत होईल. या अभ्यासक्रमात डिजिटल टेक्नोलॉजी, हॉस्पिटल मॅनेजमेंट, भविष्यात उद्भवणारे आजार, एआयचा प्रभावी वापर याचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामुळे डॉक्टर आणि विद्यार्थी डिजिटल युगासाठी सज्ज होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कोयटा फाऊंडेशनच्या चिफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीमती गोयल यांनी सांगितले की, डिजिटल हेल्थ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील. आरोग्य व तंत्रज्ञानाच्या संगमातून तयार करण्यात आलेला हा अभ्यासक्रम गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महत्वपूर्ण ठरेल. याव्दारा रुग्ण व डॉक्टर संवाद कौशल्य विकसित करण्यात येतील. डेटा सायन्स, डिजिटल टुल व जागतिक आरोग्य विषयक आव्हाने यांचा अभ्यासक्रमात प्राधान्याने समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी एनएबीएचचे सीनियर मॅनेजर निशांत मेंधे यांनी सांगितले की, डिजिटल हेल्थ आरोग्य विद्यापीठाने डिजिटल आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रात टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, जे भविष्यात रुग्णांना अधिक सुलभ आणि प्रभावी आरोग्यसेवा पुरवण्यासाठी निश्चितच सहायक ठरतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी एनएबीएच येथील डिजिटल हेल्थचे ग्रुप लिडर अविनाश पांडे यांनी सांगितले की, डिजिटल हेल्थ आपल्या देशात इको-सिस्टम विकसित करणे गरजेचे आहे त्यासाठी विद्यापीठाने सुरू केलेला अभ्यासक्रम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या सर्टिफिकेट इन डिजिटल हेल्थ अभ्यासक्रमाच्या उद् घाटनाकरीता विद्यापीठाच्या ’चक्र’चे प्रभारी मुख्य प्रशासकीय अधिकारी ब्रिग. सुबोध मुळगुंद, डॉ अश्लेषा तावडे, डॉ सानिया भालेराव यांनी समन्वयन केले.