
खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवत स्पर्धेत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली : महाराष्ट्र राज्य फेन्सिंग असोसिएशन व जिल्हा फेन्सिंग संघटना यांच्यातर्फे अथक परिश्रम घेऊन ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामुळे सहभागी सर्व क्रीडापटूंनी खेळाडूवृत्ती दाखवत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन व हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय सब-ज्युनिअर फेन्सिंग स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. लिंबाळा मक्ता येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा सुरू झाली आहे. जिल्हा क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे उद्घाटक आमदार तान्हाजी मुटकुळे हे होते तर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ उदय डोंगरे, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख, डॉ बंकट यादव, उपाध्यक्ष प्रकाश काटुळे, राजकुमार सोमवंशी, शेषनारायण लोंढे, प्रा पांडुरंग रणमाळ, राजेंद्र भांडारकर, दत्ता गलाले, राजू शिंदे, पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करत खेळाडूंनी या स्पर्धेतील अनुभव सोबत घेऊन जावे. प्रत्येक स्पर्धेतून आपला अनुभव समृद्ध करून घेत यश मिळविण्यासाठी सतत प्रयत्नरत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळाले असल्याचे सांगून त्यांनी आपल्या खेळ कौशल्याचा उत्तम प्रत्यय देण्याचे सांगत स्पर्धकांमध्ये उत्साह वाढविला.
आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीही फेन्सिंग हा आत्मसंरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त क्रीडा प्रकार असल्याचे सांगून आयोजक व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा असोसिएशनच्या वतीने वृक्ष व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हिंगोली जिल्हा फेन्सिंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्याण देशमुख यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रस्तावना केली. तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा संदेश प्रतिनिधी म्हणून प्रा नरेंद्र रायलवार यांनी यावेळी वाचन केले.
या प्रसंगी संघटनेचे सचिव संजय भुमरे, विजय जऊळकर, अनिल कदम, सुशिल ईगोले, राष्ट्रीय खेळाडू संदीप वाघ, प्रसिद्धी प्रमुख गोपालराव सरनायक आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रीमती वानरे हलगे-वानरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ उदय डोंगरे यांनी आभार मानले.
१४ वर्षांखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा असून रविवारपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा (मक्ता), हिंगोली येथे सुरू राहणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद हिंगोली जिल्ह्याला प्रथमच देण्यात आले आहे. अशा दर्जेदार फेन्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाल्याने हिंगोलीसह सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.