
विनाअनुदानित खेळांतील खेळाडूंना ग्रेस गुण देण्याची मागणी
नाशिक ः मी स्वतः खेळाडू असल्यामुळे मी नक्कीच खेळाडूंच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करण्याचा माझा मानस आहे. परंतु, त्यासाठी मला थोडा वेळ द्या. मी सर्व गोष्टींचा विचार करुन खेळाडूंच्या न्याय्य आणि आवश्यक मागण्या पूर्ण करणार आहे, असा विश्वास राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी क्रीडा संघटकांना दिला आहे.

नाशिक जिल्हा विविध क्रीडा असोसिएशन आणि अखिल भारतीय मराठा महासंघ, नाशिक यांच्या वतीने राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना खेळाडूंना आवश्यक क्रीडा सुविधासाठी निवेदन देण्यात आले. तसेच शालेय खेळ-क्रीडा संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे या संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मीनाक्षी गिरी यांनीही क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन विनाअनुदानीत क्रीडा संघटनांच्या विविध प्रश्नासंदर्भात एक लेखी निवेदन देऊन विनाअनुदानित खेळांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बनकर, अशोक कदम, गौरव गाजरे, आनंद खरे, दीपक निकम, मुकेश गोंदकर, पृथ्वीराज गोंदकर, कुणाल अहिरे, आनंद चकोर आदींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी सर्वच खेळाडूंना सारखीच मेहनत करावी लागते. परंतु, त्यापैकी काही खेळाडूंनाच पदके मिळतात त्याचाच विचार केला जातो. परंतु सर्वच खेळाडू सारखीच मेहनत करतात तर अश्या खेळाडूंनाही शासनाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. तसेच शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ९४ खेळांचा समावेश आहे. त्यापैकी ठराविक ३०-३५ खेळांना शासनाच्या सुविधा मिळतात. जसे की, दहावी आणि बारावी इयत्तेत असलेल्या खेळाडूंना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभाग आणि प्राविण्य मिळविल्यास २५ मार्क दिले जातात. परंतु विना अनुदानित खेळांना हे मार्क मिळत नाही. शिवाय या विनाअनुदानित खेळांच्या स्पर्धा आयोजनाचा आणि इतर खर्च शासन करत नाही तर त्या-त्या खेळांच्या क्रीडा असोसिएशन स्वतः करतात. त्यामुळे किमान या खेळाडूंना २५ मार्क मिळावे, तसेच या खेळाडूंनाही नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण मिळावे असे निवेदन देण्यात आले.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू मेडल मिळविण्यात अग्रेसर आहेत. राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे ९० टक्के खेळाडू पहिल्या तीन क्रमांकांमध्ये असतात. हरियाणा, पंजाब आणि इतर काही राज्यांच्या खेळाडूंसाठी या राज्यांनी नोकरी आणि इतर सुविधामध्ये मोठी तरतूद केलीली दिसून येते. परंतु त्याच गुणवत्तेच्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना या सुविधा कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंना या सर्व सुविधा मिळाव्या असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन स्वीकारताना क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, मी स्वतः खेळाडू असल्यामुळे मी नक्कीच खेळाडूंच्या प्रगतीसाठी ज्या ज्या बाबी आवश्यक आहेत त्या पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. परंतु त्यासाठी मला थोडा वेळ द्यावा. मी सर्व बाबींचा विचार करून खेळाडूंच्या न्याय्य आणि आवश्यक मागण्या पूर्ण करणार असे सांगितले.