
सासवड ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे “खेळातून वसुंधरेकडे” या संकल्पनेतून “चिखल महोत्सव” आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवा अंतर्गत कुस्ती, कबड्डी, कोलांटी उडी शर्यत, पुशअप्स, सीटअप्स आदी खेळांच्या स्पर्धा चिखलाच्या हौदात आयोजित करण्यात आल्या होत्या.
चिखल महोत्सवा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या निकाली कुस्ती स्पर्धेत शिवम वडार या पहिलवानाने पांडुरंग भोसले यास चीतपट करून मानाची ढाल जिंकली. शिवम वडार याला मानाची ढाल व ३ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सहभागी खेळाडूंनी चिखल महोत्सवाचा भरपूर आनंद लुटला.
महोत्सवाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ पंडित शेळके यांनी, “माती पासून आजचा युवक दुरावत चाललेला आहे. जीवनदायी मातीशी पुन्हा नाळ जोडण्यासाठी अशा उपक्रमांची आजच्या युगात गरज असल्याचे प्रतिपादन केले.” निसर्गोपचार उपचार पद्धती मध्ये मड थेरपीचे फार मोठे महत्त्व आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उपक्रमाचे आयोजन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांनी केले तर डॉ संजय झगडे यांनी आभार मानले. सदर प्रसंगी लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे, डॉ अनिल झोळ, रवी जाधव, अंकुश धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.