
ऑस्ट्रेलियाने शेवटचा टी २० सामना ४ धावांनी जिंकला
नवी दिल्ली ः भारतीय महिला अ संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या टी २० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. या मालिकेत सलग तीन सामने गमावल्याने भारतीय संघाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला.
या मालिकेतील तिसरा सामना मॅककॉयच्या मैदानावर खेळवण्यात आला. त्यामध्ये यजमान ऑस्ट्रेलिया महिला अ संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ गडी गमावून १४४ धावा केल्या. त्यामध्ये मॅडलिन पेन्नाने ३९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १४० धावा करता आल्या, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत सिएना जिंजरने सर्वाधिक ४ गडी बाद केले.
६ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत
ऑस्ट्रेलिया महिला अ संघाविरुद्ध १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय महिला अ संघाची सुरुवात खूपच खराब झाली. यामध्ये दिनेश वृंदा आणि उमा छेत्री या दोघीही १६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्या. त्यानंतर शेफाली वर्मा हिने राघवी बिश्तसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात फलंदाजीने विशेष कामगिरी दाखवू न शकलेली शेफाली या सामन्यात २५ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ४१ धावांची खेळी करू शकली.
राघवी बिश्तने या सामन्यात २५ धावांची खेळी केली तर मिनू मनीने ३० धावांची खेळी केली परंतु दोन्ही खेळाडू टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात यशस्वी होऊ शकल्या नाहीत. या सामन्यात भारतीय संघाच्या ६ खेळाडू फलंदाजीत दुहेरी आकडाही गाठू शकल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून सिएना जिंजरने ४ बळी घेतले, तर एमी एडगर आणि लुसी हॅमिल्टन यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. या विजयासह ऑस्ट्रेलिया महिला अ संघाने मालिका क्लिन स्वीप करण्यात यश मिळवले.
प्रेमा आणि कर्णधार राधा यांची प्रभावी गोलंदाजी
या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला अ संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात प्रेमा रावत आणि कर्णधार राधा यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात प्रेमा आणि रावत यांनी ३-३ बळी घेतले. याशिवाय सजीवन सजना यांनाही एक बळी घेण्यात यश आले. प्रेमा रावतसाठी गोलंदाज म्हणून ही मालिका खूप चांगली होती ज्यामध्ये तिने तिन्ही सामन्यांमध्ये खेळताना एकूण ७ बळी घेतले.