
थांग-ता संघटनेचे सचिव महावीर धुळधर यांची पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
अमरावती ः ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशनतर्फे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना लेखी निवेदन देऊन भ्रष्टाचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मान्यता मिळावी अशी आगळी-वेगळी मागणी करण्यात आली आहे.
ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशनचे सरचिटणीस महावीर धुळधर यांनी पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात महावीर धुळधर यांनी म्हटले आहे की, थांग-ता हा भारतीय देशी खेळ प्रकार असून १९९३ पासून महाराष्ट्रात सुरू आहे. शालेय संघाने २००९ मध्ये शालेय क्रीडा स्पर्धेसाठी थांग-ता या क्रीडा प्रकाराला मान्यता दिलेली आहे. तसेच २०१९ पासून खेलो इंडिया युथ गेम्समध्ये थांग-ता खेळाला समाविष्ट करण्यात आले आहे. गतवर्षी खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. देशपातळीवर महाराष्ट्र संघ थांग-ता या खेळात चमकत असला तरी महाराष्ट्रात शालेय क्रीडा स्पर्धेकरिता थांग-ता या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित केलेले नाही.
अनुदानित व विनाअनुदानित खेळ प्रकार कोणत्या नियमाने करण्यात आले आहे याचा खुलासा अद्यापही करण्यात आलेला नाही. २०१३ मध्ये मंत्रालयातून फोनद्वारे सूचना देऊन ४२ खेळांना स्थगिती देण्यात आली. अशी माहिती माहितीचा अधिकार अंतर्गत मिळाली आहे. काही भ्रष्ट अधिकाऱयांची मागणी पूर्ण न केल्याने हा प्रकार करण्यात आला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करण्यास शासनाने मान्यता देऊ अशी आगळी-वेगळी भूमिका सचिव महावीर धुळधर यांनी पालकमंत्री बावनकुळे यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.