
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बँक ऑफ बडोदा पुरस्कृत ७ ते १४ वर्षामधील ६ वयोगटातील शालेय मुलामुलींची बीओबी चषक जलद बुद्धिबळ स्पर्धा १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना मान्यतेने प्रत्येक वयोगटातील गुणानुक्रमे पहिल्या १५ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच दोन वयोगटाचे विजेतेपद पटकाविणाऱ्या एका बुद्धिबळपटूला क्रीडाप्रेमी सुरेश आचरेकर स्मृती विशेष रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात स्विस लीग पद्धतीच्या किमान ४ फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे स्पर्धकांना बुद्धिबळ पट व घड्याळ दिली जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे १२ ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा.