 
            ठाणे ः हॉकी लिजेंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार समिती आणि कालीरामन फाऊंडेशन भारत यांच्या वतीने ठाण्याच्या यशोधन नगर येथील कराटेपटू सतिश बळीराम पाटील यांची मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
हा मानाचा पुरस्कार येत्या २९ ऑगस्ट २०२५ रोजी मेजर ध्यानचंद जयंती (राष्ट्रीय क्रीडा दिन) निमित्ताने कोल्हापूर येथे भव्य समारंभात प्रदान केला जाणार आहे. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून तसेच क्रीडा संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खेळाडूंना हा सन्मान दिला जातो.
सतिश पाटील यांच्या यशामागे त्यांचे मार्गदर्शक व वडील कै बळीराम पाटील यांचे अमूल्य योगदान आहे. तसेच त्यांचे कराटे प्रशिक्षक हांशी परमजीत सिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सतिश बळीराम पाटील हे पाच डिग्री ब्लॅक बेल्ट (जपान) धारक, आंतरराष्ट्रीय कराटेपटू, तसेच ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार २०२१ आणि शंभू गौरव पुरस्कार २०२० विजेते आहेत. त्यांनी एशियन कराटे चॅम्पियनशिप, तैवान २००४, वर्ल्ड चॅम्पियन सिलेक्शन, मेक्सिको २००५, नॅशनल गेम्स, गुवाहाटी आसाम २००७ यांसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
राष्ट्रीय स्तरावर त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी एकूण १७ पदके (१ सुवर्ण, ९ रौप्य, ७ कांस्य) जिंकली आहेत. ते महाराष्ट्र राज्य कराटे टीमचे कोच, राष्ट्रीय कराटे कोच, राष्ट्रीय कराटे पंच, तसेच ठाणे जिल्हा आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे प्रमुख आहेत. अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. याशिवाय ते महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच व ठाणे जिल्हा कबड्डी पंच म्हणूनही कार्यरत आहेत.
सतिश पाटील यांनी कराटे या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश मिळवले असून, हा पुरस्कार त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे व समर्पणाचे फलित आहे. कार्यक्रमाचे विशेष निमंत्रक प्रा. अमोल साठे, निवड समिती प्रमुख प्रा नितीन शिंदे यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



