
ठाणे ः शिक्षकी व्यवसाय हा केवळ नोकरी नसून ती एक आयुष्यभराची साधना आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रमोद वाघमोडे यांचा प्रवास. शिक्षकी कारकिर्दीतील एक वेगळा विक्रम त्यांनी नुकताच साध्य केला आहे.
श्री मावळी मंडळ ठाणे संचलित एस एम एम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ठाणे, या विद्यालयात केजी ते दहावीपर्यंत अध्यापनाची संधी मिळाल्यानंतर आता त्याच संस्थेत सुरू झालेल्या ज्युनिअर कॉलेजमध्ये सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या तिन्ही शाखांमध्ये अध्यापन करण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
या विशेष प्रसंगी संस्थेने त्यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले, तर विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करून अविस्मरणीय क्षण साकारला. “याच्यापेक्षा दुसरं काय हवं?” असे आनंदाने प्रमोद वाघमोडे म्हणाले. वाघमोडे सरांची अध्यापनशैली, क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि विद्यार्थ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. आजच्या या कार्यामुळे एकाच छताखाली विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसोबत अध्यापनाचा अनुभव घेणारे वाघमोडे सर हे शिक्षक कम्युनिटीतील सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.