सोलापूर ः शांग्लूओ चीन या ठिकाणी ४ ते १३ डिसेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारे १५ वर्षांखालील मुले व मुलींची वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सहभाग होणार आहे. भारतीय संघाची निवड करण्यासाठी भारतीय शालेय खेळ महासंघाने राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन २५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे या ठिकाणी केले आहे.
राष्ट्रीय निवड चाचणीकरिता राज्याचे खेळाडू सहभागी होणार असून राज्य निवड चाचणीकरिता थेट विभागीय निवड चाचणीचे आयोजन १४ ऑगस्ट रोजी केले आहे. जिल्ह्यातील इच्छुकांनी महाराष्ट्र मंडळाचे चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय पुणे येथे सकाळी ८ वाजेपर्यत उपस्थितीत रहावे. निवड चाचणीकरिता जाताना संबंधित खेळाडूंनी वयाचा पुरावा जन्म दाखला, आधारकार्ड, शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेला जनरल रजिस्टरची छायांकित प्रत घेऊन जावे. या निवड चाचणीकरिता सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे. निवड चाचणीकरिता मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड (7219155252) यांच्याशी संपर्क साधावा.