
पुणे : पुण्याच्या डॉक्टर शर्वरी इनामदार यांनी व्ही के कृष्णमेनन इनडोअर स्टेडियम कोझिकोड येथे झालेल्या ‘मास्टर क्लासिक व इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेत क्लासिक व इक्विप्ड या दोन्ही प्रकारात विजयश्री खेचून आणली.
विविध राज्यातील स्पर्धकांसोबत चुरशीची लढत देत त्यांनी महाराष्ट्रासाठी सात सुवर्णपदके व एक रौप्य पदकांची कमाई केली. महिलांच्या ५७ किलो वजनी गटात दुहेरी मुकुट पटकावत त्यांनी मानाचा ‘बेस्ट लिफ्टर ऑफ इंडिया’ म्हणजेच स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया हा किताब आठव्यांदा पटकावला.
देशभरातील सुमारे ५६० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. गेल्या ३० वर्षातील सर्वात उच्चांकी खेळाचे प्रदर्शन या स्पर्धेत झाले. या स्पर्धेत गोवा, तेलंगणा, ओडिसा, मध्यप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, दिल्ली, छत्तीसगड आदी राज्यांच्या खेळाडूंसोबत त्यांची लढत झाली.
डॉक्टर शर्वरी इनामदार यांना पती डॉक्टर वैभव इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले. दिनांक १० ते १९ ऑक्टोबर दरम्यान केप टाऊन -साऊथ आफ्रिका येथे होणाऱ्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप साठी त्यांची निवड झाली आहे.
डॉ शर्वरी इनामदार म्हणाल्या, या स्पर्धेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली याचा आनंद आहे. या स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवण्याचे ध्येय आहे. आई -वडील, कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्या पाठिंब्यामुळेच उच्च पातळीवरचे यश मिळवणे शक्य होते, असेही त्यांनी सांगितले.