
मुंबई ः गोल्डकोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत आयोजित २०२५ अध्यक्ष चषक – ओशिनिया (जी ३) व २०२५ ऑस्ट्रेलियन ओपन (जी २) या दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धांसाठी तुषार सिनलकर यांची ‘आंतरराष्ट्रीय पंच’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तुषार सिनलकर हे तायक्वांदो खेळातील क्योरूगी तसेच पुमसे या दोन्ही प्रकारातील आंतरराष्ट्रीय पंच असून ते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक देखील आहेत. त्यांनी आतापर्यंत ४ आंतरराष्ट्रीय, ३० हून अधिक राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडविले असून ५ वेळा अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कामगिरी पाहिली आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई पॅरा तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत त्यांना ‘उत्कृष्ट प्रशिक्षक’ म्हणून गौरविण्यात आले होते.
नवी मुंबई पोलीस दलातील तुषार यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेत पंच तसेच प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तुषार सिनलकर हे विविध राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, भारतीय संघ निवड चाचणी, शालेय स्पर्धा यांमध्ये पंच, स्पर्धा प्रमुख तसेच भारतीय संघ निवड समिती सदस्य, इ. जबाबदार्या पार पाडत आले आहेत.
तुषार यांच्यामध्ये शिकण्याची जबरदस्त आवड, नियमित शिबीर, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रामाणिक प्रयत्न ह्या गुणांमुळे त्यांनी आज देशपातळीवर तसेच देशाबाहेर देखील नावलौकिक प्राप्त झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगांवकर तसेच महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन, रायगड व ठाणे जिल्हा संघटना, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय तसेच नवी मुंबई महापालिका पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी त्यासोबत त्यांचे सहकारी, मित्रपरिवार तसेच नातेवाईक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.