
छत्रपती संभाजीनगर ः आयएसएफ आयोजित वर्ल्ड स्कूल व्हॉलिबॉल अंडर १४ मुले-मुली चॅम्पियनशिप विभागीय निवड चाचणी गारखेडा भागातील विभागीय क्रीडा संकुलात यशस्वीरित्या संपन्न झाली.
येत्या ४ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत शांग्लूओ-चीन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारे वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल (अंडर १४ मुले-मुली) चॅम्पियनशिप आयोजित होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार असून, भारतीय संघाची निवड करण्यासाठी भारतीय शालेय खेळ महासंघाने राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन २५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे या ठिकाणी निश्चित केले आहे.
या राष्ट्रीय निवड चाचणीत राज्याचे खेळाडू सहभागी होणार असून, राज्याचा निवड चाचणी संघ निश्चित करण्यासाठी राज्य निवड चाचणीचे आयोजन श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे या ठिकाणी करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी थेट विभागीय निवड चाचणीचे आयोजन १२ ऑगस्ट रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे यशस्वीरित्या झाले. व्हॉलीबॉल तज्ञ अभिजित दिक्कत, जिल्हा व्हॉलिबॉल संघटना सचिव सतीश पाठक, जब्बार पठाण यांच्या उपस्थितीत खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीत छत्रपती संभाजीनगर विभागातून १५ मुली आणि २२ मुलांनी सहभाग नोंदवला होता यातून निवड समितीने ५ खेळाडूंची निवड केली व ३ राखीव खेळाडू म्हणून निवडले आहेत. त्याबरोबरच मुलींमधून सुद्धा ५ खेळाडूंची निवड केली व ३ राखीव खेळाडूंची निवड आली.
छत्रपती संभाजीनगर विभागातील राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी निवड झालेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय निवडीसाठी पात्र व्हावे यासाठी त्यांना निवड समितीने शुभेच्छा दिल्या. क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी यादवराव यांनी काम पाहिले व शुभेच्छाही दिल्या.