
नवी दिल्ली ः १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य आणि टेनिसपटू लिएंडर पेस यांचे वडील वेस पेस यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेस पेस पार्किन्सन आजाराने ग्रस्त होते आणि मंगळवारी सकाळी त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वेस पेस यांचा भारतीय खेळांशी दीर्घकाळ संबंध आहे. त्यांच्या देखरेखीखाली अनेक खेळाडूंना वेगवेगळ्या खेळांमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. वेस यांनी भारतीय खेळांसाठी खूप काही केले. ते भारतीय हॉकी संघात मिडफील्डर पदावर खेळायचे. याशिवाय, त्यांनी फुटबॉल, क्रिकेट आणि रग्बीसारख्या अनेक खेळांमध्येही हात आजमावला. वेस पेस यांनी १९९६ ते २००२ पर्यंत भारतीय रग्बी फुटबॉल संघाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
ते क्रीडा औषध डॉक्टर देखील होते. त्यांनी आशियाई क्रिकेट परिषद, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि भारतीय डेव्हिस कप संघासह अनेक क्रीडा संस्थांमध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणूनही काम केले.