
पुणे ः पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कॅम्प, पुणे येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ इक्बाल शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
समारंभाची सुरुवात एनएसएस आणि एनसीसी युनिट्सच्या विद्यार्थ्यांच्या संचलनाने झाली. त्यानंतर एनएसएस प्लस २ च्या स्वयंसेवकांनी राष्ट्रगीत सादर करून उपस्थितांनी देशभक्तीची भावना व्यक्त केली. आपल्या भाषणात प्राचार्य डॉ इक्बाल शेख यांनी स्वातंत्र्याच्या अमूल्य वारशाची आठवण करून देत देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक होऊन नवनिर्मिती, तंत्रज्ञान, पर्यावरणसंवर्धन आणि सामाजिक सलोखा यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगाचे औचित्य साधून बी वोक (एम एल टी) विभागातर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ इकबाल शेख यांच्या हस्ते झाले. तसेच विद्यार्थ्यांकडून फिलबो सेंटर लॅबची सुरुवात करण्यात आली, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास क्रीडा विभाग प्रमुख डॉ अय्याज शेख, उपप्राचार्य इम्तियाज आगा, सुपरवायझर प्रा नसीम खान, लेफ्टनंट कर्नल डॉ शाकीर शेख (रजिस्ट्रार), इस्माईल सय्यद, प्रा असद शेख, प्रा इम्रान पठाण यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा मुशर्रफ हुसेन (जिमखाना चेअरमन) यांनी केले. देशभक्ती, एकता आणि बंधुतेचा संदेश देत हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.