
क्रीडा संघटनांतर्फे पालकमंत्री आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सत्कार
नंदुरबार ः नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची जिल्हा क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या.

नंदुरबार जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे नंदुरबार शहरात अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक उभारावा, जेणेकरून जिल्ह्यातील ॲथलेटिक्स खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची तयारी करता येईल, अशी मागणी करण्यात आली. तसेच नंदुरबार जिल्हा आर्चरी असोसिएशनतर्फे धनुर्विद्या खेळासाठी आवश्यक साहित्य खरेदी व मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा, या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. ही विनंती क्रीडा शिक्षक तथा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव व आर्चरी संघटनेचे अध्यक्ष डॉ मयुर ठाकरे यांनी केली.
या वेळी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी प्रशासनाला तात्काळ पाठपुरावा करून सिंथेटिक ट्रॅक तसेच आर्चरी खेळासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी मिताली सेठी, प्रांताधिकारी अंजली शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रीडा अधिकारी महेश पाटील, तसेच क्रीडा शिक्षक भागूराव जाधव, अनिल रौंदळ, जितेंद्र पगारे, नंदू पाटील, मनीष सनेर, खुशाल शर्मा, योगेश माळी, हेमचंद्र मराठे, जिल्हा क्रीडा कार्यालयातील कर्मचारी व जिल्ह्यातील अनेक खेळाडू उपस्थित होते. या निवेदनामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात नवे पर्व सुरू होऊन ॲथलेटिक्स व आर्चरीसारख्या खेळांना चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.