
सासवड येथील वाघिरे महाविद्यालय येथे तिरंगा दौड उत्साहात संपन्न
सासवड ः भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय सासवड येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी तिरंगा दौड -आरोग्य मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.
“धावूया भारतासाठी, धावूया आरोग्यासाठी” हे घोषवाक्य घेऊन ही स्पर्धा प्राचार्य डॉ पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व शारीरिक शिक्षण संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली होती. चेहऱ्यावर तिरंगा रंगवून महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रशासकीय कर्मचारी, शिपाई, विद्यार्थी, स्थानिक नागरिक अशा सर्वांनी सदर मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन अतिशय उत्साहपूर्वक व देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात भारतीय एकतेचा संदेश दिला.

भारतीय म्हणून वेगवेगळ्या धर्म, प्रांत, जाती, पंथात जरी विभागलो असलो तरी भारतीयत्व व तिरंगा हे प्रतीक आम्हा सर्वांना एकत्र करते ही भावना सहभागी नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ पंडित शेळके यांनी “भारतीय या नात्याने कोणत्याही प्रसंगात एकत्रित राहणे गरजेचे आहे व भारताला महासत्ता बनवायचे असल्यास आरोग्य जपणे ही भारतीय नागरिक म्हणून आपली आद्य जबाबदारी आहे” असे मत व्यक्त केले.
सदर मॅरेथॉन उद्घाटन प्रसंगी उपप्राचार्य डॉ बी यू माने, डॉ संजय झगडे, अशोक कोंढावळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांनी केले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
३ किलोमीटर धावणे आरोग्य मॅरेथॉन विद्यार्थी पुरुष गट : १. गोपाल चव्हाण, २. आनंद कोकरे, ३. अभिजित कुंभारकर.
विद्यार्थी महिला गट : १. दीपिका निषाद, २. श्रावणी जगताप, ३. पियुषा वालगुडे.