< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); जळगाव येथे तरूणींच्या साहसाला सलाम !  – Sport Splus

जळगाव येथे तरूणींच्या साहसाला सलाम ! 

  • By admin
  • August 17, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान हरिजन कन्या छात्रालयाच्या गोपिका पथकाला

जळगाव ः रोप मल्लखांब…चित्तथरारक कसरती…सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमांतून जळगावच्या गोपिकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित केला. सोबतीला शौर्यवीर, पेशवा, वज्रनाथ ढोलपथकातील ४१५ वादकांनी परिसर दणाणून सोडला. या जल्लोषपूर्ण वातावरणात गोपिकांचे मानवी मनोरे जळगावकरांचे लक्ष वेधून घेत होते. अखेर उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान हरिजन कन्या छात्रालय या गोपिकांच्या पथकाने मिळविला.‌ त्यांना विशेष पारितोषिकाने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे बॅरिस्टर निकम चौक मैदानावर (सागर पार्क) युवतींच्या दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, ऐश्वर्या रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, अग्रणी बँकेचे सुनील दोहरे, माजी महापौर विष्णू भंगाळे, जेडीसीसी बँकचे संचालक अरविंद देशमुख, गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ केतकी पाटील, युवतींच्या दहिहंडी समितीच्या अध्यक्ष डॉ कल्याणी नागुलकर, प्रा शमा सराफ, नीलम जोशी, अनिता पाटील, यामिनी कुळकर्णी, सोनाली महाजन, चेतना नन्नवरे, लिना पवार, डॉ हेमांक्षी वानखेडे, श्रीया कोकटा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुढील वर्षापासून विजेत्या संघाना रोख पारितोषिके देण्याची घोषणा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली.

मान्यवरांच्या हस्ते सुरवातीला दहिहंडी पूजन करण्यात आले. दरम्यान दहिहंडी फोडणाऱ्या गोपिकांच्या पथकाला चषकाने सन्मानित करण्यात आले. यासोबतच इतर सहभागी झालेल्या संघानासुद्धा गौरविण्यात आले. यावेळी छाया बोरसे, मंजुषा भिडे, कामिनी धांडे, छाया चिरमाडे या परीक्षकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
 
महाराष्ट्रात एकमेव युवतींची दहीहंडी गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे. यंदाच्या सागर पार्क झालेल्या सोहळ्याप्रसंगी मुख्य व्यासपीठासह तीन अन्य व्यासपीठाची स्वतंत्र व्यवस्था केली होती. दहीहंडी पथकात यंदा प्रथमच युवतींचे ११ संघातील सुमारे ५०० गोपिकांनी सहभाग घेतला.
 
जळगावकरांची प्रचंड गर्दी
गोपिकांच्या दहीहंडीत विविध चित्तथरारक कवायती, रोप मल्लखांब, सांस्कृतिक नृत्य आदी. प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शौर्यवीर, पेशवा, वज्रनाद या ढोलपथकाचे ४१५ वादक पुणेरी ढोल-ताशाच्या माध्यमातून परिसर दणाणून गेला होता. यावर्षी उत्सव पाहण्यासाठी जळगावकरांनी प्रचंड गर्दी करुन गोपिकांचा उत्साह वाढविला.
 
गोपिकांची अकरा पथके
 गोपिकांची दहीहंडी फोडण्यासाठी यंदा प्रथमच अकरा युवतींचे पथके आली होती. या पथकामध्ये किड्स गुरूकुल शाळा, नुतन मराठा महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, ॲड एस ए बाहेती महाविद्यालय, के सी ई सोसायटी मुलींचे वसतीगृह, जी एच रायसोनी महाविद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, के के इन्स्टीट्युट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल, आर आर शाळा, एन सी सी या पथकांचा समावेश होता.
युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया यांच्यासह पदाधिकारी व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे सहकारी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. अय्याज मोहसीन यांनी संचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *