
स्वीडन देशात फडकविला भारताचा झेंडा
छत्रपती संभाजीनगर ः कलमार- स्वीडन येथे जागतिक ट्रायथलॉन असोसिएशनतर्फे आयोजित आयर्नमॅन-स्वीडन या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या दर्शन नितीन घोरपडे याने आयर्नमॅन हा किताब पटकावला. दर्शन घोरपडे हा मराठवाड्यातील पहिला तरुण आयर्नमॅन ठरला आहे आणि दर्शनने स्वीडन देशात भारताचा तिरंगा फडकावला आहे.
या स्पर्धेत जगभरातून ३००० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. जगभरात अतिशय अवघड असणार्या या स्पर्धेत ३.८ किलोमीटर समुद्रात पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि सोबतच ४२ किलोमीटर रनिंग हे तिन्ही १६ तासांच्या आत पूर्ण करणे अनिवार्य असते.
दर्शन घोरपडे याने ही स्पर्धा १५.०१ तासात यशस्वीपणे पूर्ण करून आयर्नमॅन हा किताब पटकविला. या स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वीपणे पूर्ण करून आयर्नमॅन किताब मिळविणारा दर्शन घोरपडे हा मराठवाड्याचा पहिला तरुण आयर्नमॅन ठरला आहे.
आयर्नमॅन दर्शन घोरपडे याने या पूर्वी दोन वेळेस आयर्नमॅन ७०.३ (हाफ आयर्नमॅन) पूर्ण केले होते, वडिल आयर्नमॅन नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने संपूर्ण तयारी केली होती. स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग या तिन्ही प्रकारात प्रभुत्व मिळवण्यासाठी दर्शन घोरपडे याने प्रचंड मेहनत घेतली.
दर्शन घोरपडे महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच वडिलांचा व्यवसायात मदत करत असून, शिक्षण, व्यावसाय आणि शारीरिक सुदृढ असणे या पायर्यांवर वडिलांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम करीत आहे. तरुणांपुढे एक चांगले उदाहरण दर्शन याने स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले आहे. या कामगिरीवर आयर्नमॅन नितीन घोरपडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.