राज्य बॅडमिंटन स्पर्धेत निनाद, सारा, सार्थक, आदित यांची आगेकूच

  • By admin
  • August 18, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः योनेक्स-सनराईज भास्करराव सानप मेमोरिअल सीनियर स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धेला शानदार सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगरच्या निनाद कुलकर्णी, सारा साळुंके, सार्थक नलावडे, आदित येणगेरेड्डी या खेळाडूंनी विजयी सुरुवात केली.

विभागीय क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत राज्यातून ३५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात ही स्पर्धा खेळवली जात आहे.

उद्घाटन सोहळ्यानंतर झालेल्या सामन्यात छत्रपती संभाजीनगरच्या निनाद कुलकर्णीने पुरुष एकेरीत प्रेम वर्मा याला १५-१०, १५-१२ ने पराभूत केले तर छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलावडे आणि आदित येणगेरेड्डी या जोडीने अंशूल जाधव व निकुंज पांडे यांचा १५-६, १५-९ ने पराभव केला.

महिला एकेरीत सारा साळुंके हिने रुद्राणीराजे निंबाळकर हिच्यावर १५-७, १५-६ ने विजय मिळवला तसेच संस्कृती सातारकर हिने शिवानी हेरळकर हिला १५-९, १५-६ ने हरवले. तर वृषाली ताडमडगे हिने श्रावणी पडवळ हिला ५-१५, १५-९, २१-२० अशा चुरशीच्या सामन्यात पराभूत केले.

सर्व मानांकित खेळाडूंनी विजय साकारात आगेकूच केली आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार असून या स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा उत्कृष्ट खेळ बघण्याची पर्वणी छत्रपती संभाजीनगर वासियांना मिळाली असल्याची माहिती महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे तथा जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस सिद्धार्थ पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *