
बटगेरी स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा
सोलापूर ः कांताबाई प्रभाकर बटगेरी स्मृती चषक जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात १७ वर्षीय वरद लिमकर याने गत दोन स्पर्धेतील विजेता स्वप्नील हदगल याला पराभूत करत सनसनाटी निकाल नोंदवला.
सुंदर मल्टिपल मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत १४० खेळाडूंनी भाग घेतला आहे. पांढऱ्या सोंगट्या घेऊन इटालियन ओपनिंग प्रकाराने डावाची सुरुवात झालेल्या डावात मध्यपर्वापर्यंत डावाची स्थिती समान असतानाच स्वप्नीलने केलेल्या एका चुकीने हत्ती गमावला. त्यामुळे स्वप्नीलचा सहज पराभव झाला. प्रज्वल कोरे, अमित मूदगुंडी, श्रेयस कुदळे, सागर गांधी, श्रेया संदूपटला व देवनपल्ली श्रावणी आणि १४ वर्षे वयोगटात विहान कोंगारी, श्लोक चौधरी, समरजीत देशमुख, विराज धोंगडे, मल्हार वाघे, सार्थक उंबरे हे खेळाडू ४ पैकी ४ गुण घेऊन आघाडीवर आहेत
या स्पर्धेत ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १७, १९ व खुल्या गटात मिळून ९० चषक देण्यात येणार असून त्याशिवाय रोख २१ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक प्रभाकर बटगेरी यांचे हस्ते झाले. या प्रसंगी प्रयोगशाळा कार्यालय न्याय सहाय्यक डॉ आनंदा कुदळे, वैशाली गोसावी, सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सचिव शरद नाईक, प्रमुख पंच प्रशांत पिसे, सुशील कुमारजी शिंदे भावी प्रशाला अध्यक्ष संतोष पैकेकरी, अमर शिंदे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन वैभव बटगेरी यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ श्री रमा जगदीश बहुउद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्या वतीने व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या सहकार्याने करण्यात आले आहे.