
आराध्या मोहिते सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराची मानकरी
ठाणे ः ठाणे जिल्हा वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवत तब्बल ५१ पदकां कमाई केली. या स्पर्धेत अथर्व जोशी याने विजेतेपद पटकावले तर आराध्या मोहिते ही सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. तसेच सिया सिंग, आर्यन व अर्जुन बिराजदार यांनी दुहेरी मुकुट संपादन केला.
दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये योनेक्स-सनराईज व सीएट पुरस्कृत ठाणे जिल्हा वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून तसेच विविध भागांतून खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. याशिवाय नवोदित पण अत्यंत गुणी खेळाडूही या स्पर्धेत उतरले होते. एकूण १६ इव्हेंट्समध्ये ५०० हून अधिक प्रवेशिका नोंदवल्या गेल्या, जी संख्या बॅडमिंटन खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतीक ठरली.
या स्पर्धेत सय्यद मोदी योजनेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ५१ पदकांची कमाई केली. या कामगिरीत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांचा समावेश असून उत्कृष्ट आयोजन, स्पर्धेतील चुरस आणि मोठा प्रतिसाद हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठळकपणे दिसून आले.
या स्पर्धेतून ठाण्याची पुरुष व महिला वरिष्ठ संघाची निवड झाली असून हा संघ प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. सन २०२४ मध्ये ठाण्याच्या पुरुष संघाने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
अथर्व जोशी याने उत्कृष्ट खेळाची परंपरा कायम ठेवत अनंत भागवत स्मृती पुरुष एकेरी विजेतेपद पटकावले. आराध्या मोहिते हिने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे दीपा घाटणेकर स्मृती उदयोन्मुख खेळाडू हा सन्मान पटकावला. तर सिया सिंग, आर्यन बिराजदार आणि अर्जुन बिराजदार यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकत ‘दुहेरी मुकुट विजेते’ होण्याचा मान मिळवला.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पुरोहित आणि माजी खासदार तसेच नामवंत पत्रकार कुमार केतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत कौतुकाचा वर्षाव केला. “आजच्या युगात खेळ हे केवळ करिअर नाही तर व्यक्तिमत्व घडवणारा मूलभूत आधार आहे. विविध भागातील खेळाडूंनी दाखवलेला आत्मविश्वास आणि मेहनत अतुलनीय आहे,” अशा शब्दांत त्यांनी खेळाडूंची प्रशंसा केली. तसेच, पालकांशी संवाद साधून त्यांनी मुलांच्या क्रीडा जडणघडणीसाठी योगदान दिल्याबद्दल आभार मानले.
सर्व खेळाडू हे सय्यद मोदी कोचिंग प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षित असून, या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी समाधान व्यक्त करत म्हटलं – “ठाण्याच्या खेळाडूंच्या मेहनतीला आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाला आज यश मिळालं आहे. पुढील काळात हेच खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ठाण्याचं नाव उंचावतील.” क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांनीही सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.