
मुंबई ः श्रीकांत स्पोर्ट्स क्लब व सार्वजनिक गणेशोत्सवतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने विविध जिल्ह्यातील १६ वर्षांखालील शालेय मुला-मुलींसाठी श्रीकांत चषक विनाशुल्क कॅरम स्पर्धा ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.
शालेय कॅरम खेळाडूंची प्रमुख स्पर्धेत उत्तम कामगिरी होण्यासाठी पालकांच्या विशेष मागणीनुसार स्पर्धात्मक खेळासह मोफत मार्गदर्शन देखील दिले जाणार आहे. चॅम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा बाद पद्धतीने होईल.
कांदिवली-पूर्व येथील श्रीकांत स्पोर्ट्स क्लबच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिवर्षी युवा खेळाडू व कलाकारांना प्रोत्साहन देतांना विविध समाजोपयोगी उपक्रमांपैकी मोफत शालेय कॅरम स्पर्धा गतवर्षापासून अधिक लोकप्रिय ठरत आहे. म्हणूनच संस्थेतर्फे पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष तेजस शाह व सचिव प्रणव निकुंभ यांनी दिली. सदर स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संदीप आयरे किंवा अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे २० ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा.