
भास्करराव सानप स्मृती राज्य बॅडमिंटन स्पर्धेचा शानदार समारोप
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या योनेक्स-सनराईज भास्करराव सानप मेमोरियल सीनियर स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला एकेरीत पूर्वा बर्वे आणि पुरुष एकेरीत संकल्प गुराला यांनी विजेतेपद पटकावले.
विभागीय क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी झाला. महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे डेप्युटी प्रेसिडेंट शिरीष बोराळकर, उद्योगपती अमित सानप व महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे सरचटणीस सिद्धार्थ पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अंतिम सामन्यात पुरुष एकेरीत संकल्प गुराला याने सर्वेश यादव याला हरवले तर पुरुष दुहेरीत आर्य व ध्रुव ठाकोरे या जोडीने विप्लव व विराज कुवळे या जोडीचा २७-२५, २१-१३ असा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. महिला एकेरीत पूर्वा बर्वे हिने तनिष्का देशपांडेवर २१-१५, २१-१५ असा विजय मिळवला आणि विजेतेपद संपादन केले. तसेच महिला दुहेरीत नेहल गोसावी व निकिता जोसेफ या जोडीने श्रुती मुंदडा व तनिष्का देशपांडे या जोडीचा २१-१९, २०-२२, २१-१७ अशा फरकाने पराभव केला. मिश्र दुहेरीत दीप रामबिया व रितिका ठक्कर या जोडीने अमन संजय फारुख व अनघा करंदीकर या जोडीचा २९-३०, २१-१५,२१-१३ असा पराभव केला
बॅडमिंटन खेळातून भारताचे ऑलिम्पिक सुवर्णपदक यावे अशी अपेक्षा महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी व्यक्त केली. तसेच बॅडमिंटन आणि क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. भविष्यात असेच सामने आयोजित करण्यात येतील असे संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले. स्पर्धेचे आभार प्रदर्शन हिमांशू गोडबोले यांनी केले. या कार्यक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष विरेन पाटील, अतुल कराड, अरुण गुदगे, ऋतुपर्ण कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, कृपा तेलंग आदी उपस्थित होते.