
गुकेशचा सामना कार्लसनशी होणार
नवी दिल्ली ः भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा ऑक्टोबरमध्ये सेंट लुईस, अमेरिकेत होणाऱ्या क्लच बुद्धिबळ प्रदर्शन सामन्यात त्याचा दीर्घकाळचा प्रतिस्पर्धी रशियाचा गॅरी कास्पोरोव्हशी होईल, तर विश्वविजेता डी गुकेशचा सामना मॅग्नस कार्लसनशी होईल.
कास्पोरोव्ह आणि आनंद यांचा शेवटचा सामना २०२१ मध्ये झाग्रेबमधील क्रोएशिया रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेत झाला होता आणि त्यामध्ये विश्वनाथन आनंद याने विजय मिळवला होता. दोघांमध्ये ८२ सामने झाले आहेत, त्यापैकी ३० सामने अनिर्णित राहिले आणि विजयाच्या बाबतीत कास्पोरोव्हचे वर्चस्व आहे.
सेंट लुईस बुद्धिबळ क्लबने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “दोन माजी विश्वविजेते गॅरी कास्पोरोव्ह आणि विश्वनाथन आनंद एका विशेष क्लच बुद्धिबळ (महापुरुष) प्रदर्शन सामन्यात (७ ते ११ ऑक्टोबर) एकमेकांसमोर येतील. हा प्रदर्शन सामना क्लबच्या नवीन सुविधेत होणारा पहिला सामना असेल.” दोन्ही दिग्गजांमध्ये बुद्धिबळ ९६० सामन्यांच्या (फिशर रँडम) १२ फेऱ्यांमध्ये १४४,००० डॉलर्सची बक्षीस रक्कम दिली जाईल. हे सामने रॅपिड आणि ब्लिट्झ टाइम कंट्रोलमध्ये खेळवले जातील. त्यानंतर, २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान ४१२,००० डॉलर्सच्या बक्षीस रकमेसह क्लच बुद्धिबळ चॅम्पियन्स शोडाउन आयोजित केला जाईल ज्यामध्ये जगातील नंबर वन खेळाडू कार्लसन, जगातील नंबर दोन खेळाडू हिकारू नाकामुरा, नंबर तीन फॅबियानो कारुआना आणि गुकेश सहभागी होतील.