
नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकचे महत्व पावसाळी वातावरणात स्पर्धकांना कळून आले. भर पावसात कुठेही खंड न पडता शर्यती सुरळीत पार पडल्या.
महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्हा संघटनेच्या विविध वयो गटातील स्पर्धा रंगतदार होत आहे. श्रावण महिना असल्याने अधून मधून सरी कोसळणे हे गृहित धरावे लागते. त्याची पूर्ण कल्पना जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि तांत्रिक समितीच्या सदस्यांना असते. काही वर्षांपूर्वी जेव्हा सिंडर ट्रॅक होता, त्यावेळी पावसाची सर आली की प्रचंड दाणादाण उडायची. खर्चही भरमसाठ व्हायचा. आता ते खर्चाचे दिवस दूर झाले आहेत ते विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅकच्या निर्मितीमुळे. या ट्रॅकचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते आणि त्यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या अनेक अधिकाऱ्यांचे कौतुक केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे क्रीडाप्रेमी असून त्यांच्या सहकार्याने विद्यापीठाचा क्रीडा चेहरा-मोहरा बदलला आहे. नव्हे त्यांनी स्पर्धकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटविली, त्याचे प्रत्यक्ष दर्शन रातुम नागपूर विद्यापीठाच्या ट्रॅकवर झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गणपतराव सुभेदार यांचे आशीर्वाद विद्यापीठाच्या क्रीडांगणावरील प्रत्येक स्पर्धकाला मिळत आहेत याची जाणीव होत आहे. मान्सून स्पर्धा असल्याचे जाणवत होते.