मराठवाडा शिक्षक संघाची मागणी
धाराशिव ः शालार्थ प्रणालीत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी व गहाळ कागदपत्रांच्या शालेय अभिलेख्यावरून साक्षांकित प्रती अपलोड करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे व छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत शासनास निवेदन दिले. मराठवाडा शिक्षक संघाने पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की शालार्थ २.० मधे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रथम नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता, रूजू रिपोर्ट आणि शालार्थ आयडी आदेश अपलोड करणे सुरू आहे. सुरुवातीला दोन हजार बारा नंतर शालार्थ आयडी मिळालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्र अपलोड करण्यास सांगण्यात आले होते. परंतु नंतर सरसकट सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीस किंवा त्याहून अधिक सेवा झालेल्या अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक शाळात बदल्या झालेल्या आहेत, अनेक शाळेत मुख्याध्यापक बदलले आहेत, अनेक संस्थेमधे संस्थांतर्गत वाद आहेत व मुळ कागदपत्र संस्थाचालकांकडे आहेत, अनेक शिक्षक समायोजनाने दुसरीकडे गेले आहेत. पहिले संस्थाचालक त्यांना कागदपत्र देत नाहीत. अशा अनेक कारणांमुळे मुळ कागदपत्रे मिळण्यात अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शारीरिक, आर्थिक व मानसिक स्वास्थ्य बिघडले असून त्याचा अध्यापन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचे म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिक्षणातील बोगसगीरी पकडण्यासाठी हे जर सुरू असेल तर ‘दुखणं हाल्याला व इंजेक्शन पखाली’ला असाच हा प्रकार आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित वेतन व भनिनि पथक कार्यालयातून दरवर्षी वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, यादी व शासनाने भरतीस परवानगी दिलेली शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या जरी पडताळून पाहिली तरी हा घोटाळा उघडा पडतो. परंतु त्यासाठी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यास मुळ नियुक्ती आदेश, रूजू रिपोर्ट व वैयक्तिक मान्यता मागणे हास्यास्पद आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षक वर्ग परेशान झालेला आहे. त्यांच्यामधे असंतोष निर्माण झालेला आहे. याची दखल घ्यावी.
शालार्थ प्रणालीत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. मूळ कागदपत्र गहाळ असतील वा मिळत नसतील तर शालेय अभिलेख्यावरून अशा कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अपलोड करण्यास परवानगी देण्यात यावी, अप्रिय घटना टाळाव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, कोषाध्यक्ष औताडे ए बी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव चंद्रकांत चव्हाण यांनी दिला आहे अशी माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने यांनी दिली आहे.