
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य विभागाअंतर्गत “स्पर्धा परीक्षा व रोजगारांच्या संधी” या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते हे होते तर प्रमुख पाहुणे व वक्ते अक्षय चोळके, सिद्धेश्वर कोंघे, संचालक सारथी एज्युकेशन व संजीत कदम हे होते. वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख डॉ आर बी लहाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात वाणिज्य विभागाअंतर्गत दरवर्षी होणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांविषयी सांगत विद्यार्थ्यांनी त्यात कशा पद्धतीने सहभागी व्हावे या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते अक्षय चोळके यांनी बँकिंग परीक्षांची करावयाची तयारी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये कोणते विषय असतात व त्या विषयांची तयारी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे याविषयी खूप प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. तसेच सिद्धेश्वर कोंघे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची व बँकिंगच्या परीक्षांची करावयाची तयारी याविषयी मार्गदर्शन करत आपण बँकिंग हे क्षेत्र का निवडावे व आज बँकिंग या क्षेत्राची आवश्यकता व त्यात उपलब्ध संधी त्यामुळे दरवर्षी होणारी भरती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जनरल अवेअरनेस हा विषय आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो हे सांगितले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते यांनी सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून देत बँकिंग क्षेत्राची आवश्यकता व त्यात उपलब्ध संधी याविषयी सांगितले. बँकिंग क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना आज असलेला सामाजिक दर्जा व सुविधा याविषयी विद्यार्थ्यांना सांगत त्यांनी बँकिंग क्षेत्र का निवडावे हे सांगितले. सदरील कार्यक्रमासाठी २३० विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रणिता चिटणीस यांनी केले तर आभार प्रदर्शन गायत्री खटाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.