
तीनशे खेळाडू सहभागी
पुणे ः क्रीडा भारती पुणे महानगरतर्फे रविवारी (२४ ऑगस्ट) डॉक्टर हेडगेवार चषक दहावी खुली रॅपिड बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत तीनशे खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे
ही स्पर्धा पुणे जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात २४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी खुला गट तसेच दहा व चौदा वर्षाखालील खेळाडू असे विभाग ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये खुल्या गटात अविरत चव्हाण गौरव बाकलीवाल, ओम लामकाने, १४ वर्षाखालील गटात निहीरत कौल, अभय वाळवेकर, विहान देशमुख, १० वर्षाखालील गटात शुभंकर बर्वे, ऋषिकेश गोखले, अर्जुन कौलगुड या आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचा समावेश आहे.
या स्पर्धेसाठी २५ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेतील खुल्या गटाकरिता ५ हजार रुपये, ३५०० रूपये व २ हजार रुपये अशी पहिली तीन पारितोषिक ठेवण्यात आली असून दहाव्या क्रमांकापर्यंत रोख पारितोषिक दिले जाणार आहे. दहा व चौदा वर्षाखालील गटासाठी एक हजार रुपये व सुवर्णपदक, सातशे रुपये व रौप्यपदक, पाचशे रुपये व कांस्यपदक अशी पहिली तीन पारितोषके ठेवण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या विभागाकरिता सातशे रुपयांचे पहिले पारितोषिक ठेवण्यात आले असून दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी चारशे रुपयांचे बक्षीस दिले जाईल. महिला विभागाकरिता सातशे रुपये, पाचशे रुपये व तीनशे रुपये अशी पहिली तीन पारितोषिके दिली जाणार आहेत बिगरमानांकीत खेळाडूंसाठी सातशे रुपये व पाचशे रुपये अशी पहिली दोन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तीन ते पाच क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी तीनशे रुपयांचे बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून राजेंद्र शिदोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.