
‘आंतरक्लब स्पॅरिंग ट्रेनिंग’- प्रत्येक महिन्यात दोनदा
पुणे ः पुणे शहर बॉक्सिंग संघटना ही महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना यांच्याशी संलग्न आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे तर विद्यमान अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २२ वर्षांपासून पुणे शहर व परिसरात बॉक्सिंग खेळाचा प्रसार व प्रचाराचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
गौरवशाली पर्व
पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या माध्यमातून आजवर अनेक भव्य आणि प्रतिष्ठित स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा, राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा, शालेय जिल्हा, विभागीय, राज्य बॉक्सिंग स्पर्धा, पहिली को कप क्लास ऑल इंडिया बॉक्सिंग चॅम्पियनशिप, युथ राष्ट्रीय स्पर्धा अशा स्पर्धांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांमुळे पुण्यातील खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाले असून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविण्याची संधी मिळाली आहे.

पुण्याचा क्रीडा परंपरेतील हा प्रवास केवळ अभिमानास्पदच नव्हे तर पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पुणे शहरातून अनेक वर्षांपासून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडू घडवले आहेत. त्यामध्ये आजपर्यंत पुणे शहरातून तब्बल ४ शिवछत्रपती पुरस्कार विजेते घडले त्यामध्ये गिरीश पवार, राकेश कळसकर, सलमान शेख, रेनॉल्ड जोसेफ आहेत.
तसेच अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमकदार ठसा उमटवला आहे. याशिवाय, अनेक बॉक्सर खेळाडूंनी केवळ खेळातच नव्हे तर शासकीय सेवेत देखील आपले स्थान निर्माण केले आहे. पोलीस भरती, सैन्य भरती, इंडियन रेल्वे, इंडियन एअर फोर्स, इंडियन नेवी तसेच सीआरपीएफ अशा केंद्र व राज्य सरकारच्या विविध सेवांमध्ये पुण्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
पुणे शहर बॉक्सिंग संघटना आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “She Can & She Will” या उपक्रमांतर्गत महिला बॉक्सिंग खेळाडूंकरिता ‘महिला दत्तक योजना’ राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त, भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक डी. चादरलाल यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसांचा विशेष बॉक्सिंग ट्रेनिंग कॅम्प आयोजित करण्यात आला. या यशस्वी परंपरेनंतर संघटनेने आता आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे. ‘आंतरक्लब स्पॅरिंग ट्रेनिंग प्रोग्राम’ या नावाने हा उपक्रम दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत नियमितपणे राबविण्यात येणार आहे.

नवीन तंत्रांचा अनुभव मिळवून देणे महत्त्वाचे ः अविनाश बागवे
संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले, “शहर व जिल्ह्यातील सर्व क्लब, प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये संवाद, एकोपा व सहकार्य वाढविणे, एकत्रित सरावातून प्रत्येक खेळाडूला नवीन तंत्रांचा अनुभव मिळवून देणे आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. बॉक्सिंग हा केवळ शारीरिक ताकदीचा खेळ नसून त्यात तंत्र, रणनीती आणि मानसिक तयारी यांचा मोठा वाटा असतो. एकत्र सरावामुळे खेळाडूंच्या खेळात सातत्य, शिस्त आणि नवनवीन प्रयोगशीलता निर्माण होईल.”

एकत्रित सरावाचा मोठा फायदा ः विजय गुजर
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी “एकत्रित सरावाचे महत्त्व आणि त्यातून होणारे फायदे यावर भर दिला. विजय गुजर म्हणाले की, “पुणे शहर, पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व प्रशिक्षकांनी जर एकत्र येऊन सराव सत्र आयोजित केले, तर खेळाडूंना प्रचंड फायदा होईल. प्रत्येक प्रशिक्षकाची शिकवण्याची स्वतंत्र शैली आणि वेगळे तंत्रज्ञान अनुभवण्याची संधी बॉक्सरना मिळेल. त्यामुळे खेळाडूंचे तांत्रिक प्राविण्य अधिकाधिक वाढेल आणि ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम, स्पर्धात्मक व प्रगत होतील.”