
छत्रपती संभाजीनगर ः मलेशिया येथील कुचिंग या ठिकाणी झालेल्या दहाव्या आशियाई पॅरा तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या रुद्र पांडे याने चमकदार कामगिरी बजावत आपला ठसा उमटवला.
आशियाई पॅरा तायक्वांदो स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंमध्ये रुद्र पांडे हा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. रुद्र पांडे याने जून महिन्यात पंजाब, फगवारा येथील निवड चाचणी स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावत आपले भारतीय संघात स्थान निश्चित केले होते. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठत जागतिक क्रमवारीत ८.६४ गुणांसह आपले ११ वे स्थान निश्चित केले आहे. महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारची कामगिरी करणारा रुद्र पांडे हा दुसरा खेळाडू आहे. रुद्र याच्या या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे.