
आरोग्य विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
नाशिक ः आरोग्य क्षेत्रात संशोधन व तंत्रज्ञानाला अधिक व्यापकता मिळण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आयआयटी बॉम्बे, टोकोमी फेलो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’संगम-२०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ संपन्न झाला. यावेळी राज्याच्या माजी मुख्य सचिव सुजाता सौनिक, विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सतीश अग्निहोत्री, प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रात संशोधनाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात कार्य करता येईल. विविध संस्था, कंपनी व विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प प्रभावीपणे मांडता येतील. यासाठी निधी उपलब्ध करुन देणे व त्यासाठी नेटवर्किंग सुविधा असणे गरजेचे आहे.
’संगम-२०२५’ च्या माध्यमातून विविध विषयावरील तज्ज्ञांनी सहभाग घेतला. यामध्ये शोधनिबंधाचे सादरीकरण, पोस्टर प्रेझेंटेशन व स्पर्धेच्या माध्यमातून संशोधकांना वाव मिळाला आहे. आरोग्य व तंत्रज्ञानाच्या नवीन वाटा खुल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता व हेल्थ टेक्नोलॉजीचा वापर करुन अधिक सक्षमपणे काम करणे शक्य होईल. आरोग्य विद्यापीठ आणि आयआयटी बॉम्बेच्या संगमातून हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, ’संगम-२०२५’ करीता विविध देशातून संशोधकांनी केलेले सादरीकरण उत्कृष्ट होते. विजेत्यांची निवड करणे परीक्षकांसाठी एक मोठे आव्हान होते कारण प्रत्येक सादरीकरण दर्जेदार होते. या स्पर्धेतून अनेक नवीन कल्पनांना आणि युवा नेतृत्वाला प्रोत्साहन मिळेल. विविध देशातील, राज्यातील संशोधक, उद्योजक व तज्ज्ञांच्या सहभागाने या परिषेदेला मुर्त रुप आले. तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि डिजिटल हेल्थ केअरसाठी ही परिषद दिशादर्शक ठरेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून विद्यापीठात आरोग्य सेवा क्षेत्रातील नवनवीन धोरणे, तंत्रज्ञान आणि भविष्यातील दिशा मोठया प्रमाणात मंथन झाले. आरोग्य क्षेत्रातील धोरणर्निमितीसाठी ते अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. संगम हे केवळ वैचारिक देवाणघेवाणीची परिषद नसून तो एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि आयआयटी बॉम्बे यांच्यात ’संगम’ च्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ कारभारी काळे उपस्थित होते.
आरोग्य शिक्षणात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा विद्यापीठाकडून जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. सन २०२४-२५ चा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार डॉ जया कुरुविल्ला यांना देण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवार्थींना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या परिषदेतील शोधनिबंध सादरीकरणाच्या स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक विजेत्या डॉ आयशा अन्सारी यांना रुपये दहा हजार रकमेचा धनादेश बक्षिस म्हणून देण्यात आला. तसेच द्वितीय क्रमांक विजेत्या डॉ शृंखला कौशिक यांना रुपये सात हजार रकमेचा धनादेश बक्षिस म्हणून तर तृतीय क्रमांक विजेत्या डॉ सिमरन भाटीया पाच हजार रकमेचा धनादेश बक्षिस म्हणून देण्यात आले.
या परिषदेतील पोस्टर प्रेझेन्टेशन मध्ये डॉ अमित कौर यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांना रुपये दहा हजार रकमेचा धनादेश बक्षिस म्हणून देण्यात आला. तसेच द्वितीय क्रमांक विजेत दिपांशु शर्मा यांना रुपये सात हजार रकमेचा धनादेश बक्षिस म्हणून तर तृतीय क्रमांक विजेती डॉ पुजा कदंबी रुपये पाच हजार रकमेचा धनादेश बक्षिस म्हणून देण्यात आले.
या परिषदेत हेल्थ महाकुंभ, जेरिऑट्रीक केअर व मेंटल हेल्थ आदी विषयांवर घेण्यात आलेल्या ’दिशा हॅकेथॉन’ स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या होलो हेल्थ टीमला रुपये पंचवीस हजार रकमेचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. द्वितीय क्रमांक विजेता इलिक्झायर टीमला रुपये वीस हजार रकमेचा धनादेश तसेच तृतीय क्रमांक विजेता फिटमेड टीमला रुपये पंधरा हजार रकमेचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे ’चक्र’ कंपनीचे बोधचिन्ह क्रियेटर मृण्मयी गुरखेचा कुलगुरूंच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या परिषदेच्या समारोप समारंभात जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ’संगम-२०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रायोजकांचा विद्यापीठ परिवारातर्फे सन्मान करण्यात आला. यामध्ये मयुर जोशी, विनय सिंग, अमित चिंचखेडे व सुमित जगदाळे यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ महेंद्र पटाईत, डॉ सुप्रिया पालवे, डॉ सुनिता संकलेचा, डॉ सपना शिंदे, डॉ स्नेहा धारणे, करिश्मा भंडारी, प्राध्यापक वामसी यांनी विशेष प्रयत्न केले तसेच सायंटिफिक सेशनकरीता डॉ दुहिता कोडरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, संशोधक, अभ्यागत, अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.