
सासवड ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सासवड येथील वाघिरे महाविद्यालय येथे खेळाडू, विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी कपिंग थेरपीचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ पंडित शेळके यांनी “स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतींसोबतच ‘पर्यायी उपचारात्मक पद्धतींचा’ वापर समाजाने केला पाहिजे. तसेच ग्रामीण भागात विविध उपचार पद्धती पोहचविणे ही आपली जबाबदारी आहे. ऑलिंपिक सारख्या सर्वोच्च स्पर्धेत एकूण २८ पदके पटकविणारा अमेरिकन जलतरणपटू मायकल फेल्प्स याने आशियातील प्राचीन कपिंग थेरपीचा उपयोग करून आपले कार्यमान वाढविले,” असे मत व्यक्त केले.
पाठीचे दुखणे, स्नायूंचे व गुडघे दुखी स्नायूंवरील ताण, निद्रानाश, रक्तवाहिन्या फुगुन झालेल्या नसांतील गाठी आदी संबंधित आरोग्य समस्या असलेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात ड्राय कपिंग, वेट कपिंग, मोक्सा कपिंग, फंक्शनल कपिंग, मसाज कपिंग आदी विविध प्रकारांची माहिती देऊन प्रत्यक्ष उपचार करण्यात आले.
या शिबिरात कपिंग थेरपिस्ट व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांनी सहभागी खेळाडू व कर्मचाऱ्यांचे निदान व उपचार केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे कर्मचारी कल्याण विभागाच्या प्रमुख डॉ सुवर्णा खोडदे व शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ सचिन कुमार शाह, डॉ उल्हास लंगोटे, डॉ अण्णासाहेब निंबाळकर, प्रा प्रशांत शिंदे, प्रा संदीप व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.