
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा क्रीडा विभागाच्यावतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील क्रीडा नियोजन समितीची बैठक, उद्बोधन वर्ग व गुणवंत खेळाडूंचा सत्कार समारंभ मंगळवारी (२६ ऑगस्ट) आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात खेळाडूंना रोख रक्कम, ब्लेझर देऊन गौरवण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक स्पर्धेचे वेळापत्रक तयार करुन घोषित करण्यात येईल. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या नाट्यगृहात मंगळवारी सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होईल. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू अनन्या पाटील, प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या बैठकीत संलग्नित महाविद्यालयाचे क्रीडा संचालक उपस्थित राहणार आहेत. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ व पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात येईल. तसेच प्रशिक्षक, संघ व्यवस्थापनक व निवृत्त क्रीडा संचालकांचा गौरव करण्यात येणार आहे. क्रीडा संचालक, खेळाडूंनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर व क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख यांनी केले आहे.