
ऑलिम्पियन कविता राऊत, राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार डॉ भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती
छत्रपती संभाजिनगर ः ऑलिम्पियन आणि सावरपडा एक्सप्रेस म्हणून परिचित असलेली कविता राऊत ही छत्रपती संभाजीनगरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्य आणि देशाचे प्रतिनिधित्व करणारे ५५० हून अधिक चॅम्पियन खेळाडूंच्या पाठीवर सत्काराच्या माध्यमातून कौतुकाची थाप देणार आहे.
२९ ऑगस्ट हा दिवस प्रतीवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रसंगी क्रीडा भारती, छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेने २०२४-२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व जळणाऱ्या ५५० पेक्षा अधिक खेळाडूंचा सत्कार आयोजित केला आहे.
शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.३० वाजता ऑलिम्पियन तथा अर्जुन पुरस्कारार्थी कविता राऊतच्या उपस्थितीत निराला बाजार स्थित तापडिया नाट्य मंदिर येथे हा सत्कार सोहळा होईल. महाराष्ट्राचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ भागवत कराड हे छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन मुळे यांच्यासह पाहुणे असतील.
शहरातील खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांचे सदस्य आणि शहरातील क्रीडा प्रेमींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी एका प्रसिद्धीपत्रकात केले आहे. क्रीडा भारती व जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, कार्याध्यक्ष बिजली देशमुख, उपाध्यक्ष डॉ उदय डोंगरे, सचिव गोविंद शर्मा, वरिष्ठ सहसचिव डॉ दिनेश वंजारे, कोषाध्यक्ष विश्वास जोशी व अन्य मान्यवर सदस्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
कविता राऊत – जन्मजात धावपटू
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळील सावरपाडा येथे राहणाऱ्या कविता राऊत यांनी २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तिचे बालपण अडथळ्यांनी भरलेले होते. परंतु त्यापैकी कोणताही अडथळा तिला खेळाचा ‘महाकुंभ’ अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकला नाही. २०१० कॉमनवेल्थ गेम्समध्ये कविताने देशासाठी कांस्यपदक जिंकले होते. पाचवी वर्गाच्या पाठ्यपुस्तकात सरकारने तिचा उत्साहवर्धक प्रवास देखील धडा स्वरूपात समाविष्ट केला आहे.