
- क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही
मुंबई ः २०१२ या क्रीडा धोरणाची लवकरच पुनर्रचना करण्याचे आश्वासन राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे. तसेच राज्यातील क्रीडा प्रबोधिनी, स्वयंसिद्धा, स्पोर्ट्स नर्सरी या योजनांचे स्वरूप देखील बदलण्यात येईल असे सांगितले.
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील अनेक योजनांचा उल्लेख करून त्यामध्ये बदल करून पुन्हा चालू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे शासनाच्या अनेक योजना निधी अभावी गुंडाळण्यात आल्या होत्या त्याही नव्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे असे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
राज्य क्रीडा धोरण समिती सदस्य अविनाश ओंबासे यांनी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन राज्यातील क्रीडा संदर्भात सविस्तर चर्चा केली. राज्यात १९९४ साली पहिले क्रीडा धोरण तयार करण्यात आले. दिवंगत क्रीडा महर्षी भीष्मराज बाम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सरकारला धोरणाचा मसुदा बनवून दिला होता. पण सरकारी अनास्थेमुळे हा मसुदा बरेच वर्ष तसाच धूळ खात पडला होता. त्यानंतर १९९६ साली मनोहर जोशी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी हे क्रीडा धोरण राबवले खरे पण त्याचा पाहिजे तस्सा फायदा झाला नाही. राज्याला क्रीडा धोरण होते पण ते दिशाहीन असल्याने त्याचा फायदा खेळाडूंना व क्रीडा क्षेत्राला उपयोग झाला नाही. त्यावेळी राज्याच्या क्रीडा धोरणा विषयी राज्यातील क्रीडाक्षेत्रात असणारी उदासीनता लक्षात घेऊन क्रीडा पत्रकार अविनाश ओंबासे यांनी २०१० साली राज्य क्रीडा धोरणाचा पंचनामा ही १२ लेखांची मालिका वृत्तपत्रात लिहिली आणि या मालिकेचा संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर खूप मोठा परिणाम झाला. या मालिकेचा आधार घेत तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व बाळा नादगावकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले, त्याचा परिणाम होऊन मुख्यमंत्र्यांना राज्याचे क्रीडा क्रीडा धोरण बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला. नवीन क्रीडा धोरण आखण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली क्रीडा धोरण समिती नेमण्यात आली त्यामध्ये राज्यातील दिग्गज क्रीडा तज्ञांचा बरोबरच काही खासदार, आमदार यांचाही समावेश होता. या समितीने संपूर्ण राज्याचा क्रीडा क्षेत्राचा अभ्यास करून ५८ शिफारशी असलेल्या क्रीडा धोरणाचा मसुदा तयार करून दिला. २०१२ मध्ये हे क्रीडा धोरण राज्याला समर्पित करण्यात आले.
क्रीडा विभागातील सरकारी बांबूनी या क्रीडा धोरणातील ५८ शिफारशी अंमलात आणण्याच्या ऐवजी आपल्याला फायदेशीर आणि सोयीच्या शिफारशीची अंमलबजावणी करत बाकीच्या बासनात गुंडाळून ठेवल्या. त्यामध्ये अनेक बदल करून पुन्हा पूर्ण रचना करण्याची आता आवश्यकता असून क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या क्रीडा धोरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत धोरणावर लवकरच बैठक आयोजित केली जाईल अशी आश्वासन दिले.