
नवी दिल्ली ः ग्रँड चेस टूरच्या सिंकफिल्ड कपच्या सातव्या फेरीनंतर भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजा याला हरवून संयुक्त आघाडी घेतली. सलग बरोबरीनंतर प्रज्ञानंदाचा हा दुसरा विजय आहे. तो अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनासह ४.५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर विश्वविजेता डी गुकेश अमेरिकेच्या वेस्ली सोकडून पराभूत झाला.
लेव्हॉन आरोनियन आणि वेस्ली चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. फ्रान्सचे मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह, पोलंडचे डुडा जान क्रिस्टोफ आणि अमेरिकेचे सॅम्युअल सेव्हियन संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत. गुकेश आणि अलिरेझा प्रत्येकी तीन गुणांसह पुढच्या स्थानावर आहेत, तर नोदिरबेक अब्दुस्तारोव्ह दीड गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.
शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये सर्व सामने अनिर्णित राहिल्यानंतर, सातव्या फेरीत पाचपैकी तीन सामन्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. अलिरेझा आणि गुकेश व्यतिरिक्त, नोदिरबेकलाही पराभवाचा सामना करावा लागला ज्याचा दुडाने पराभव केला.