
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः विकास वाघमारे, मोहम्मद सोमेल सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी असरार इलेव्हन आणि पूरब जैस्वाल इलेव्हन यांच्यात झालेला रोमहर्षक सामना असरार ११ संघाने अवघ्या दोन धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात लकी क्रिकेट क्लबने राऊडी सुपर सिंग संघावर पाच विकेटने विजय नोंदवला. या लढतींमध्ये विकास वाघमारे आणि मोहम्मद सोमेल यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पूरब जैस्वाल इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. असरार ११ संघाने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकात चार बाद १७३ अशी धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना पूरब जैस्वाल संघाने शानदार प्रत्युत्तर दिले आणि १८ षटकात आठ बाद १७१ धावा काढल्या. अवघ्या दोन धावांनी पूरब जैस्वाल इलेव्हनला पराभवाचा सामना करावा लागला. या रोमहर्षक लढतीत विकास वाघमारे याने सामनावीर पुरस्कार पटकावला.
या सामन्यात मुकीम शेख याने ३६ चेंडूत ४६ धावांची आक्रमक खेळी साकारली. मुकीम याने सात चौकार मारले. एस के अनिस याने १९ चेंडूत ३७ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने तीन चौकार व तीन षटकार मारले. नदीम अन्सारी याने १६ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. त्याने दोन षटकार व तीन चौकार मारले. गोलंदाजीत विकास वाघमारे याने ३४ धावांत चार विकेट घेऊन संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. याच कामगिरीमुळे विकास वाघमारे हा सामनावीर ठरला. सुफियान अहमद याने ४० धावांत दोन गडी बाद केले. सुशील आरक याने १६ धावांत एक बळी घेतला.

मोहम्मद सोमेलची धमाकेदार फलंदाजी
राऊडी सुपर किंग आणि लकी क्रिकेट क्लब यांच्यातील दुसरा सामना देखील रंगतदार ठरला. यात लकी क्रिकेट क्लब संघाने पाच विकेट राखून सामना जिंकला. यात मोहम्मद सोमेल याची नाबाद ५६ धावांची घणाघाती फलंदाजी निर्णायक ठरली. सोमेल याने ३० चेंडूत ८ चौकार व एक षटकार ठोकत ५६ धावा फटकावत संघाला विजय मिळवून दिला. सुमित अग्रे याने २४ चेंडूत ३४ धावा काढल्या. त्याने चार उत्तुंग षटकार ठोकले. सुमित लोंढे याने १३ चेंडूत २० धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला.
गोलंदाजीत शाहरूख शाह याने १७ धावांत तीन विकेट घेतल्या. अर्शद खान याने १२ धावांत दोन बळी घेतले. रमेश साळुंके याने १५ धावांत दोन गडी बाद केले. राऊडी सुपर किंग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात नऊ बाद १२३ धावा काढल्या. लकी क्रिकेट क्लबने १२.४ षटकात पाच बाद १२६ धावा फटकावत पाच विकेटने सामना जिंकला.