
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः सुशील आरक, संकेत साहूची घातक गोलंदाजी
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात पूरब जैस्वाल संघाने साउथ-वेस्ट मल्टीमीडिया संघाचा ८४ धावांनी पराभव केला. या लढतीत सुशील आरक याने सामनावीर पुरस्कार पटकावला.
रुफीट क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. पूरब जैस्वाल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पूरब जैस्वाल संघाने २० षटकात सर्वबाद १६१ धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना साऊथ-वेस्ट मल्टीमीडिया संघ १५.१ षटकात अवघ्या ७७ धावांत गडगडला. त्यामुळे पूरब जैस्वाल संघाने तब्बल ८४ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात उमेद अख्तर याने ३६ चेंडूत ४७ धावा फटकावल्या. त्याने सहा चौकार मारले. सुफियान अहमद याने ३३ चेंडूत ४४ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याने पाच चौकार मारले. किरण लहाने याने २५ चेंडूत ३० धावांचे योगदान दिले. त्याने एक षटकार व तीन चौकार मारले.
संकेतची प्रभावी गोलंदाजी
गोलंदाजीत संकेत साहू याने प्रभावी गोलंदाजी केली. संकेतने २९ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. सुशील आरक याने केवळ ५ धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेऊन सामनावीर पुरस्कार पटकावला. अरमान मलिक याने १५ धावांत तीन बळी टिपले.