सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांची घोषणा

  • By admin
  • August 27, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

डॉ आनंद चव्हाण, संतोष खेंडे, श्रीकांत शेटे, अजित संगवे, शरणबसवेश्वर वांगी मानकरी

सोलापूर ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून यंदाच्या वर्षापासून क्रीडा, शारीरिक शिक्षण, खेळ व व्यायाम या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार देण्यात येणार असून पुरस्कार प्राप्त मान्यवरांची घोषणा कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

उत्कृष्ट शारीरिक शिक्षण अध्यापक व संचालक पुरस्काराचे मानकरी संगमेश्वर कॉलेजमधील डॉ आनंद बाळासाहेब चव्हाण हे ठरले आहेत. उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार संगमेश्वर जुनिअर कॉलेजचे संतोष धर्मा खेंडे यांना प्राप्त झाला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार स्विमिंग अँड डायव्हिंगमधील श्रीकांत गंगाधर शेटे यांना तर हँडबॉलमधील शरणबसवेश्वर सिद्धाराम वांगी यांना मिळाला आहे. तर अहिल्यादेवी उत्कृष्ट क्रीडा पत्रकारितेचा पुरस्कार दैनिक तरुण भारतचे वृत्तसंपादक अजितकुमार बापूराव संगवे यांना जाहीर झाल्याचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी सांगितले. मानपत्र, सन्मानचिन्ह, अहिल्यादेवींची मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून समितीने पुरस्कर्त्यांची निवड केली आहे.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ज्या खेळाडूंनी ऑल इंडिया, साऊथ वेस्ट झोन आणि क्रीडा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा खेळाडूंचा रोख रक्कम व पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. याचबरोबर क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांचा देखील यावेळी सन्मान केला जाणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनी शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमास खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा विभागाचे संचालक डॉ अतुल लकडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *