
सांगली : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रने जाहीर केलेल्या निवड प्रक्रियेनुसार सांगली जिल्ह्यातील खेळाडू सम्राट नितीन तोर्वे याची १७ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा १६ ते १९ सप्टेंबर या कालावधीत मथुरा, उत्तर प्रदेश येथे होणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी निवड झालेल्या खेळाडूंसाठी १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत नाशिक येथे राष्ट्रीय सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील खेळाडूंची त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे निवड करण्यात आली आहे आणि त्यामध्ये सांगलीतून सम्राट तोर्वे याची निवड झाल्याने जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. तो सध्या मराठा मंदिर संचलित रामराव विद्यामंदिर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत आहे.
या यशात त्याचे पालक, वडील नितीन तोर्वे आणि आई सरपंच सविताताई तोर्वे यांचे प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले आहे. तसेच त्याचे प्रशिक्षक एस एस चव्हाण आणि बी टी सोनावणे यांचे मार्गदर्शन त्याच्या कामगिरीमागील भक्कम आधार ठरले आहे. त्याला त्याच्या शाळेचे मुख्याध्यापक एस एन शिंदे, उपमुख्याध्यापक एस व्ही भांगरे आणि पर्यवेक्षक आर डी पाटील आणि एस एन सरक यांचे मार्गदर्शन लाभले.
सांगलीचे रहिवासी आणि सध्या मुंबई येथे कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मुंबई विभाग संपर्कप्रमुख तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे आणि कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे बिराजदार यांनी सम्राट तोर्वे याचे अभिनंदन केले असून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.