एव्हरग्रीन चषक टेबल टेनिस स्पर्धेत संतोष वाकराडकर, नीता कुलकर्णी विजेते

  • By admin
  • August 27, 2025
  • 0
  • 33 Views
Spread the love

सांघिक विभागात टॉस अकादमी ‘ब’ संघाला अजिंक्यपद

पुणे ः प्रौढांच्या एव्हरग्रीन चषक द्वितीय राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत संतोष वाकराडकर, नीता कुलकर्णी, बसाब चौधरी यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. स्मार्ट ग्रुप या सांघिक विभागात टॉस अकादमी ‘ब’ संघाला विजेतेपद मिळाले

ही स्पर्धा सर्व्ह स्पोर्ट्स प्रो एलएलपी यांच्यातर्फे डेक्कन जिमखाना क्लबच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.त्यास महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस संघटना महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांची मान्यता मिळाली आहे.‌

या स्पर्धेतील चाळीस वर्षावरील गटात टॉस अकादमी संघाचे खेळाडू वाकराडकर यांनी अंतिम सामन्यात नागपूरच्या सूरज चंद्रशेखर यांचा १५-१३,११-३,११-६ असा सरळ तीन गेम्स मध्ये पराभव केला. ५५ वर्षांवरील गटात चौधरी यांनी रवींद्र जोशी यांना १६-१४, ११-६, ११-९ असे सरळ तीन गेम्स मध्ये पराभूत करीत शानदार विजेतेपद पटकावले.

महिलांच्या साठ वर्षांवरील गटात मुंबई महानगर जिल्हा संघाच्या खेळाडू नीता कुलकर्णी यांनी अंतिम लढतीत स्वाती आघारकर यांच्यावर ११-९,११-८,१३-११ अशी संघर्षपूर्ण लढतीनंतर मात केली.

स्मार्ट ग्रुप विभागाच्या अंतिम लढतीत टॉस अकादमी ‘ब’ संघाने आपल्याच ‘अ’ संघाचा ३-१ असा पराभव केला. त्यावेळी टॉस अकादमी ‘ब’ संघाच्या वाकराडकर यांना ओंकार जोग यांच्याकडून ९-११,१०-१२,११-८, ९-११ असा पराभव पत्करावा लागला मात्र दुसऱ्या लढतीत टॉस अकादमी ‘ब’ संघाच्या कृपाल देशपांडे यांनी आदित्य गर्दे यांना ११-९,११-८,७-११,१२-१० असे पराभूत केले तर त्यांचे सहकारी सुयश कुंटे यांनी दीपक कदम यांच्यावर ११-८,११-७, १०-१२, ११-६ अशी मात करीत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. निर्णायक लढतीत देशपांडे यांनी जोग यांचा १२-१०,१२-१०,८-११,९-११, १२-१० असा पराभव केला आणि संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *