ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत गाथा सूर्यवंशी, रेम्या प्रवीण, वंश देव यांची आगेकूच

  • By admin
  • August 27, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

पुणे ः पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत गाथा सूर्यवंशी, रेम्या प्रवीण, वंश देव यांनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

पी ई सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत महिला गटात महाराष्ट्राच्या गाथा सूर्यवंशी हिने तिसऱ्या मानांकित दुर्गा कांद्रपूचा २२-२०, २१-१५ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. हा सामना ४५ मिनिटे चालला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या हसन श्री मल्लवरपूने प्रांजला निसर्गचा २१-१०, १९-२१, २१-१६ असा कडवा प्रतिकार केला. 

अव्वल मानांकित इशिता नेगी हिने नियती आलोकवर २१-११, २१-११ असा विजय मिळवला. बिगरमानांकित रेम्या प्रवीण हिने बाराव्या मानांकित अनन्या अग्रवाल हिचा २१-१६, १६-२१, २१-१२ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. भारताच्या अक्षया चौधरी अलुरू हिने मलेशियाच्या ली के झिनचे आव्हान २१-१७, २१-१७ असे संपुष्टात आणले.
 
पुरुष एकेरीत बिगर मानांकित वंश देव याने सातव्या मानांकित दीपांशूचा १६-२१, २१-१४, २१-१३ असा तीन गेममध्ये पराभव केला. चुरशीच्या लढतीत देव रुपारेलियाने अखिल रेड्डी बोब्बाचा २३-२१, १९-२१, २१-११ असा कडवा प्रतिकार केला. अव्वल मानांकित रौनक चौहानने मनजीत चौधरीला २१-१७, २१-१६ असे पराभूत केले. पाचव्या मानांकित नितिन बालसुब्रमण्यमने थायलंडच्या पैसिट थेन्थॉन्गचा २१-१७, २१-१४ असा तर चौथ्या मानांकित भारताच्या सूर्याक्ष रावत याने यूएईच्या झीम मुनावरचा २१-१५, २१-१३ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *