
एमपीपी स्पोर्ट्स पार्क येथे चंद्रपाल दंडिमे यांना क्रीडा पितामह पुरस्कार प्रदान
छत्रपती संभाजीनगर ः हिमायत बाग परिसरात वानखेडेनगर येथे एमपीपी स्पोर्ट्स पार्क या ठिकाणी नव्यानेच उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन व जिम्नॅस्टिक हॉलचे लोकार्पण मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत व जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, तसेच आमदार प्रदीप जैस्वाल यांची विशेष उपस्थिती होती. सोहळ्या दरम्यान क्रीडा पितामह पुरस्कार व्हॉलिबॉल प्रशिक्षक चंद्रपाल दंडिमे यांना देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या प्रसंगी सेवानिवृत्त न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी या क्रीडा प्रकल्पातून अनेक उदयनमुख खेळाडू निर्माण होतील व ते आपल्या जिल्ह्याचा व राज्याचा नावलौकिक करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
शहरात विविध क्रीडा केंद्र उभारली जात आहे आणि त्याचा जास्तीत जास्त संघटना व संघटक यांनी उपयोग घ्यावा. तसेच जिल्हा बॅडमिंटन संघटनेने आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन संकुल उभारावे त्यासाठी मनपा उपयुक्त जागा देईल अशी ग्वाही कमिशनर जी श्रीकांत यांनी दिली.
शहरात नामवंत ख्यातीप्राप्त असे खेळाडू या क्रीडा संकुलात तयार होत आहेत व होतील याची खात्री पांडे-जोशी परिवाराकडून आहे अशी भावना शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी या हॉलच्या बांधकामात अनेकांनी अहोरात्र मेहनत केली आहे. त्यात प्रामुख्याने शिवाजी कचरे, बॅडमिंटन संघटनेचे राज्य सचिव सिद्धार्थ पाटील आणि एशियन जिम्नॅस्टिकचे टेक्निकल कमिटी चेअरमन डॉक्टर मकरंद जोशी यांचा विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमास शहरातील विविध क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर विशेष करून उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सागर कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचे परिचय अॅड संकर्षण जोशी तर प्रास्ताविक अॅड गोपाल पांडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनायक पांडे, अनिरुद्ध पांडे, शिवम पांडे, रुद्राक्ष पांडे, विश्वेश जोशी, अनिता सिन्नरकर, अंकुश तळेगावकर, मकरंद आरोळे, सोन्या बापू, प्रभू मते, किरण कुलकर्णी, महेंद्र रंगारी अशा अनेकांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला अरुण गुदगे, मनीष जांगीड, हिमांशू गोडबोले आदी उपस्थित होते.