
दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा
बंगळुरू ः दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात विदर्भ संघाकडून खेळणारा फलंदाज डॅनिश मालेवार (नाबाद १९८) आणि आयपीएल ट्रॉफी विजेत्या संघाचा कर्णधार रजत पाटीदार यांनी शानदार शतके झळकावली. मालेवार व पाटीदार यांच्या शतकाच्या बळावर मध्य विभाग संघाने ईशान्य विभाग संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर दोन बाद ४३२ अशी भक्कम धावसंख्या उभारली आहे.
बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड बीवर हा सामना होत आहे. ईशान्य विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर मध्य विभागाने ७७ षटके फलंदाजी करत दोन बाद ४३२ अशी भक्कम स्थिती गाठली आहे. सलामीवीर आयुष पांडे (३) लवकर बाद झाला. त्यानंतर आर्यन जुयाल हा दुखापतीमुळे ६० धावांवर निवृत्त झाला.

चार धावांवर आयुष पांडेची विकेट पडल्यानंतर दुसरी विकेट कर्णधार रजत पाटीदारच्या रुपाने पडली. परंतु, तोपर्यंत मध्य विभागाने ३४७ धावा काढल्या होत्या. डॅनिश मालेवार व रजत पाटीदार या जोडीने दमदार फलंदाजी केली. रजत पाटीदार याने ९६ चेंडूत १२५ धावांची आक्रमक खेळी केली. त्यने २१ चौकार व ३ षटकार मारले. डॅनिश मालेवार याने २१९ चेंडूंचा सामना करत नाबाद १९८ धावा काढल्या आहेत. द्विशतकासाठी त्याला केवळ दोन धावांची गरज आहे. त्याने ३५ चौकार व १ षटकार मारला. यश राठोड याने ३७ चेंडूत नाबाद ३२ धावा फटकावल् आहेत. त्याने चार चौकार मारले. आकाश चौधरी (१-७३) व जोटिन (१-५६) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे.
उत्तर विभाग सहा बाद ३०८
दुसऱया सामन्यात उत्तर विभाग संघाने पहिल्या दिवसअखेर ७५.२ षटकात सहा बाद ३०८ धावसंख्या उभारली आहे. शुभम खजुरिया (२६), अंकित कुमार (३०) या सलामी जोडीने सुरेख सुरुवात केली. परंतु, दोघेही मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. यश धुल याने चार चौकार व दोन षटकारांसह ३९ धावा फटकावल्या. आयुष बदोनी याने ६० चेंडूत ६३ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याने सात चौकार मारले. निशांत सिंधू याने ७० चेंडूत ४७ धावा काढल्या. त्याने दोन षटकार व चार चौकार मारले. साहिल लोत्रा याने १९ धावा काढल्या.
कन्हैया वाधवान याने ९२ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची चिवट खेळी साकारली. त्याने तीन चौकार मारले. मयंक डागर याने पाच चौकारांसह नाबाद २८ धावांचे योगदान दिले आहे.
मनीषी याने ९० धावांत तीन बळी घेतले आहेत. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीकडे सर्वांचे लक्ष होते. शमी याने १७ षटके गोलंदाजी करत ५५ धावांच्या मोबद्लयात एक बळी घेतला. सूरज सिंग जयस्वाल याने ४० धावांत एक विकेट घेतली. मुख्तार हुसेन याने ७० धावांत एक गडी बाद केला.