
विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंचा गौरव आणि शाळा-महाविद्यालयांना अनुदानाचे वाटप
छत्रपती संभाजीनगर ः राष्ट्रीय क्रीडा दिनापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांनी एक तास हा खेळासाठी राखीव ठेवावा. विद्यार्थी मैदानावर सुद्धा खेळ खेळताना दिसायला हवेत. तसेच पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल गेम्सऐवजी मैदानावरील खेळ खेळण्यासाठी पाठवल्यास त्यांची सहनशक्ती वाढेल. जेणेकरून दैनंदिन वर्तमान पत्रामध्ये छोट्या छोट्या कारणांसाठी आत्महत्या करणाऱ्या मुलांची संख्या कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामीे यांनी केले.
विभागीय क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे बोलत होते. प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

फिट इंडिया अंतर्गत शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी राष्ट्रीय वुशु खेळाडू सेजल संजय तायडे यांच्यामार्फत सर्वांना प्रतिज्ञा देण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी अनिता चव्हाण, कशिश भरड व श्रद्धा चोपडे आणि पालक यांचा सत्कार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात २०२४-२५ या वर्षातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त ४० खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकूंद वाडकर, सुजाता गुल्हाणे, डॉ रेखा परदेशी, खंडू यादवराव, रामकिशन मायंदे, गणेश पाळवदे, सचिन पुरी, पुनम नवगिरे, शिल्पा मोरे, तुषार आहेर, सदानंद सवळे, अनिल दांडगे यांचे सहकार्य लाभले. जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी आभार मानले.
क्रीडा अनुदानाचे वितरण
या प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोत्साहनात्मक अनुदानाचे वाटप करण्यात आले. त्यात प्रामुख्याने डिफेन्स करिअर अकॅडमी (८३,५४० रुपये), केम्ब्रिज स्कूल (६२,६६५ रुपये), गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर वेरुळ (४१,७६९ रुपये), छत्रपती शिवाजी प्रिपेटरी ज्युनियर कॉलेज (८३,५३९ रुपये), डिफेन्स करिअर अकॅडमी स्कूल (६२,६५४ रुपये), रेजिमेंटल चिल्ड्रन हायस्कूल (४१,७६९ रुपये), देवगिरी महाविद्यालय (८३,५३९ रुपये), छत्रपती शिवाजी प्रिपेटरी ज्युनियर कॉलेज (६२,६५४ रुपये), डिफेन्स करिअर अकॅडमी (४१,७६९ रुपये), केम्ब्रिज स्कूल (८३,५४० रुपये), नाथ व्हॅली स्कूल (६२,६६५ रुपये), द जैन इंटरनॅशनल स्कूल (४१,७७० रुपये), केंम्ब्रिज स्कूल (८३,५३९ रुपये), देवगिरी महाविद्यालय (६२,६५४ रुपये), राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा (४१,७६९ रुपये), देवगिरी महाविद्यालय (८३,५३९ रुपये), वसंतराव नाईक महाविद्यालय (६२,६५४ रुपये), छत्रपती शिवाजी प्रिपेटरी ज्युनियर कॉलेज (४१,७६९ रुपये) या शाळा व महाविद्यालय यांचा समावेश आहे.